म्हापसा : पुढारी वृत्तसेवा
कळंगुट समुद्रकिनारी दारूच्या नशेत झालेल्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शेख समीर (२९, मूळ रा. फर्दापूर, महाराष्ट्र) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा आणि चोरीचा गुन्हा दाखल करत चार जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये रेमंड चार्ली होवसे उर्फ रॅम्बो (३६, रा. कांदोळी, मूळ झाशी, उत्तर प्रदेश), अर्जुन हनुप्पा नाईक (२२, रा. कळंगुट, मूळ गदग, कर्नाटक), मेहबर रशीद खान (६१, रा. कळंगुट, मूळ वाराणसी, उत्तर प्रदेश) आणि सलमान खान (३५, रा. सोलापूर, महाराष्ट्र) यांचा समावेश आहे. समीर आणि सर्व संशयित कळंगुट व कांदोळी-परिसरातील एका गेस्टहाऊसमध्ये काम करत होते. हे सर्व पार्टीसाठी जमले होते.
यावेळी त्यांच्यात वाद होऊन मारहाण झाली. शेख समीर यांच्या डोक्यावर दांडक्याने प्रहार करण्यात आला. त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले. उपचारांनंतर समीर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते आपल्या मूळ गावी फर्दापूर येथे गेले. तिथे प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांनी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.