फोंडा : पुढारी वृत्तसेवा
बोरी पुलाच्या पृष्ठभागाच्या डांबरीकरणाचे काम सोमवारी पहाटे ५च्या दरम्यान पूर्ण झालानंतर पुलावरून वाहतूक सुरू झाली. पुलाच्या डांबरीकरणासाठी पुलावरील पूर्ण वाहतूक रविवारी ८ रोजी रात्री ८ ते सोमवारी ९ रोजी सकाळी ८ पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर रविवारी रात्री पुलाच्या कामाला प्रारंभ झाला होता.
या पुलाच्या हॉटमिक्स डांबरीकरणासाठी खास मुंबईहून आणलेल्या पॉलिमर टेक्नॉलॉजी डांबराचा वापर या हॉटमिक्स कामासाठी करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते महामार्ग विभागाचे सहायक अभियंता आनंद वाघुर्मेकर यांनी दिली.
पूल वाहतुकीसाठी बंद ठेवलेल्या काळात कोणतीच अडचण आली नाही. शिवाय पोलिस नदीपरिवहन खात्याने दुर्भाट रासई व राय राशोल जलमार्गावरील फेरीसेवेत सातत्य ठेवले त्यामुळे वाहतूक सुरळीत झाल्याचे वाघुर्मेकर यांनी नमूद केले.