पणजी : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीची छायाचित्रे इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन तिच्याकडून खासगी छायाचित्रे आणि व्हिडिओ मागितल्याच्या आरोपाखाली २२ वर्षीय संशयित तरुणाविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केला आहे.
मात्र, या प्रकरणात फौजदारी कार्यवाही सुरू करण्यात आल्याने न्यायालयाने संबंधित संशयित तरुण, अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईला मिळून ३ लाख रुपये खर्च गोवा हायकोर्ट बार एसोसिएशनला देण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रकरणामधील पक्षाकरांनी परस्पर समझोता केला असला तरी अल्पवयीन मुलीशी संबंधित कथित गुन्हे केवळ तडजोड झाली म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही, असा पोलिसांच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. या प्रकरणाची सुरुवात ३१ जानेवारी २०२६ रोजी अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीने झाली.
'कॉन्रॅड फेरॉव २२' या इन्स्टाग्राम खात्यावरून कार्डोज याने तिची आधीची छायाचित्रे इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी दिली आणि त्याबदल्यात खासगी छायाचित्रे व्हिडिओ पाठविण्याची मागणी केल्याचा आरोप तिने केला होता. या तक्रारीवरून मायणा - कुडतरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संशयिताच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, संशयित आणि तक्रारदार मुलगी बाळपणापासूनच मित्र असून ते एकाच परिसरात वाढले आहेत. काही गैरसमजामुळे तक्रार दाखल झाली होती; मात्र त्यानंतर दोघांनी वाद मिटवला असून आता हे प्रकरण पुढे चालवण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, पोलिसांनी याचिका विरोध केला. घटना घडली त्यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याने तिची कथित संमती ग्राह्य धरता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती.