BJP’s rise and political transformation - 
गोवा

BJP’s rise and political transformation - गवताला जेव्हा भाले फुटतात

गवताला जेव्हा भाले फुटतात, नव्या विस्तारासाठी जुन्या पिढीचा त्याग विसरता येणार नाही.

पुढारी वृत्तसेवा

मयुरेश वाटवे

भाजप आज ज्या उंचीवर पोहोचला आहे, त्यात नव्या नेतृत्वाचा, नव्या सामाजिक गटांचा आणि बदलत्या राजकीय रणनीतीचा मोठा वाटा आहे. पण, या नव्या विस्तारासाठी जुन्या पिढीचा त्याग विसरता येणार नाही.

फार वर्षापूर्वी काँग्रेस गवताची चर्चा होत असे. कुठेही उगवणारे, मुळे घट्ट रोवणारे आणि कितीही तुडवले तरी पुन्हा वणारे गवत म्हणून काँग्रेस गवताची ओळख होती. काँग्रेसची देशभरातील पोहोच दाखवण्यासाठी या गवताचे उदाहरण दिले जायचे. काळ बदलला, राजकीय समीकरणे बदलली आणि काँग्रेसची जागा अनेक राज्यांमध्ये भाजपने घेतली. आज भाजपची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचे जाळे आणि शिस्त यांची चर्चा होते. मात्र, सध्या भाजपात 'सत्तेसाठी सर्वकाही' प्रयोग सुरू असल्याने मूळ भाजप निष्ठावंतांपेक्षा संधीसाधूंची गर्दी अधिक झाली आहे आणि ते डोईजड होत चालले आहेत. त्यामुळे पक्षावर जमलेली 'बेंदर' काढण्यासाठी गवतालाही भाले फुटू लागले आहेत. भाजपचे निष्ठावंत नेते, कार्यकर्ते आता ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यांनी बंडाचे निशाण फडकवायला सुरुवात केली आहे.

भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेल्या नाराजीमागे महत्त्वाकांक्षा आहेच; पण त्याहीपेक्षा पक्षासाठी तीन-चार दशके खस्ता खाऊनही डावलले जात असल्याचे शल्य अधिक आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, सिद्धेश नाईक, उत्पल पर्रीकर अशा नेत्यांच्या भूमिकांकडे केवळ बंडखोरी म्हणून पाहणे कदाचित राजकीयदृष्ट्या सोयीचे ठरेल, पण त्यामागची अस्वस्थता समजून घेण्यासाठी भाजपच्या गेल्या काही वर्षांच्या वाटचालीकडे थोडे मागे वळून पाहावे लागेल.

या नेत्यांपैकी अनेकांनी पक्षासाठी आपली राजकीय कारकीर्द पणाला लावली. पक्षाची ताकद फारशी नसताना गावागावात फिरले, संघटना उभी केली, कार्यकर्ते जोडले, निवडणुका लढवल्या आणि पराभवही स्वीकारले. सत्ता सहज उपलब्ध नसताना पक्षाच्या विचारावर विश्वास ठेवून त्यांनी राजकारण केले. त्यावेळी पक्षासाठी काम करणे म्हणजे सत्तेची हमी नव्हती. उलट, पक्ष वाढवण्यासाठी वैयक्तिक राजकीय नुकसान सहन करण्याची तयारी असणे हीच खरी निष्ठा मानली जात होती.

आज परिस्थिती बदलली आहे. भाजप सत्तेत आहे. अनेक वर्षांपासून सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या पक्षाला राजकीय स्थैर्य मिळाले आहे. सत्ता, पैसा, प्रशासन आणि निवडणूक यंत्रणा यांचे समीकरण पक्षाच्या बाजूने आहे. परंतु या यशाबरोबर एक प्रश्नही उभा राहतो. पक्षाची मूळ तत्त्वे मागे तर पडली नाहीत ना?

भाजपची ओळख शिस्तबद्ध पक्ष म्हणून झाली. पक्षाच्या आदेशाला महत्त्व देणारा, संघटनेला व्यक्तीपेक्षा मोठे मानणारा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असलेला पक्ष अशी त्याची प्रतिमा होती. पक्षाच्या निर्णयांशी मतभेद असले तरी ते सार्वजनिकरीत्या व्यक्त न करता संघटनेच्या चौकटीत राहून काम करणे, ही संस्कृती अनेक कार्यकर्त्यांनी जपली. मात्र याच निष्ठेचा पक्षाकडून गैरफायदा घेतला जातो आहे, अशी भावना निर्माण झाली तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. एखादा कार्यकर्ता किंवा नेता वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करतो, निवडणुकीत मतदारांना सामोरा जातो, पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, कार्यकर्त्यांना सांभाळतो आणि पक्ष अडचणीत असताना त्याच्या पाठीशी उभा राहतो. त्या बदल्यात त्याने पद सोडा, सन्मानाचीही दयानंद मांद्रेकर दिलीप परुळेकर अपेक्षा करू नये?

आपल्या त्यागाची दखल तरी घेतली जात आहे, एवढी भावनाही त्याच्यासाठी पुरेशी असते. आजही भाजप नेत्यांच्या तोंडी देश प्रथम, पक्ष द्वितीय आणि स्व तृतीय अशी वाक्ये असतात. पण सध्या पक्षात हे तत्त्वज्ञान केवळ पक्षाच्या मूळ सदस्यांनाच लागू होते. बाहेरून पक्षात आलेल्या नेत्यांचा क्रम नेमका उलटा आहे. आणि तो चालवूनही घेतला जात आहे. पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या जुन्या कार्यकर्त्यांना राजकीय समीकरणे बदलल्यानंतर बाजूला केले जात आहे, तर सत्तेच्या काळात पक्षाशी जोडले गेलेले किंवा सत्तेच्या जवळ राहणारे चेहरे अधिक प्रभावशाली बनत आहेत, असे त्यांना वाटू लागले आहे. राजकारणात उपद्रवमूल्यालाच आज महत्त्व आलेले आहे. ज्याचा आवाज पक्षासाठी निवडणुकीत नुकसान करू शकतो, ज्याच्याकडे स्वतंत्र जनाधार आहे, ज्याच्या नाराजीमुळे मतांचे गणित बदलू शकते, त्याचे महत्त्व राजकीय व्यवस्थेत आपोआप वाढते. मात्र पक्षशिस्तीवर विश्वास ठेवणारा निष्ठावंत नेता अनेकदा यात बळी जातो. तो बंड करत नाही, पक्ष सोडत नाही, सार्वजनिकरीत्या टीका करत नाही. त्याच्या शांततेचा अर्थ संमती असा घेतला जातो.

उत्पल पर्रीकर आज काही नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. कारण प्रश्न केवळ एका निवडणुकीचा नाही. येत्या निवडणुकीनंतर गरज पडल्यास पक्ष आणखी आमदार आयात करेल, त्यातून मतदारसंघात पुन्हा नवीन प्रतिस्पर्धी. हे दुष्टचक्र कधी संपेल याची काहीच शाश्वती नाही. एकेकाळी विचारसरणी, संघटन, कार्यकर्ता आणि राष्ट्रनिर्मिती या शब्दांभोवती पक्षाची प्रतिमा उभी होती. आज मात्र सत्तेचे गणित, निवडणुकीतील विजय, मतदारसंघांची समीकरणे आणि सत्तेत कोण किती प्रभावशाली आहे, यांना अधिक महत्त्व मिळत अशी जुन्या कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. सत्ता हे साधन न राहता साध्य बनले की पक्षाची राजकीय संस्कृती बदलते. मग विचारांपेक्षा जिंकणे महत्त्वाचे होते आणि निष्ठेपेक्षा उपयुक्तता भारी ठरते. ज्यांनी पक्ष उभा केला त्यांनी कदाचित कधी कल्पनाही केली नसेल की एक दिवस आपल्यालाच पक्षाच्या दारात आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यावी लागेल. पक्षासाठी आयुष्य घालवलेल्या कार्यकर्त्याला स्वतःच्या राजकीय भवितव्याबद्दल असुरक्षित वाटू लागले, तर ती केवळ त्याची वैयक्तिक समस्या नाही. ती संघटनेच्या अनारोग्याची खूण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT