गोवा

Goa Assembly Election : विधानसभा निवडणुकीत 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्याचे भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे आवाहन

Goa Assembly Election : लोकसभा निवडणुकीत भाजपला ५२ टक्के मते मिळाली होती.

पुढारी वृत्तसेवा

  • भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन; निवडणुकीपूर्वी सर्वसामान्यांपर्यंत जाण्याची कार्यकर्त्यांना सूचना

  • विरोधांका अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न

  • काँग्रेसकडून दिले जातेय लोकशाहीला आव्हान

पणजी : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीत भाजपला ५२ टक्के मते मिळाली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत ५० टक्क्यांहून अधिक मते मिळवून राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी ताळागाळात जाऊन काम करावे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीचा मार्ग सुकर करण्यासाठी प्रत्येक निवडणूक जिंकणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केले.

मंगळवारी भाजप मुख्यालयत आयोजित राज्य कार्यकारिणी बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, खासदार सदानंद शेत तानावडे, गोवा प्रभारी डॉ. भारती पवार आणि शिव प्रकाश यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, गोव्याचा भरीव विकास झाला असून, विकासाची ही गती कायम ठेवण्यासाठी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आवश्यक आहे.

विरोधक लोकशाही संपवून देशात अराजकता निर्माण करत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या रक्षणासाठी देशात आणि राज्यात भाजपचे सरकार हवे. गोव्यातील विकास पाहता २०२६ मध्ये पुन्हा कमल फुलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कंग्रिसमुळे गोव्याला उशिरा स्वातंत्र्य मिळाल्याचे सांगून नबीन यांनी गोवा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहीली.

भाजप म्हणजे विकास आणि स्थिर सरकार असून, पक्ष दिलेली आश्वासने पाळतो, असे ते म्हणाले. याउलट हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमधील काँग्रेस सरकारांनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप त्यांनी केला. अटल सेतू आणि झुहारी पूल यासारखे प्रकल्प गोव्याच्या विकासाचे मॉडेल असल्याचे त्यांनी नमूद केले.

भाजपमध्ये निस्वार्थी कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांना मोठी पदे दिली जातात, तर इतर पक्षामध्ये घरानेशाही चालते, अशी टीका नबीन यांनी केली. मनोहर पर्रीकर यांनी भाजपला वेगळी ओळख दिली, साधेपणा जपला आणि विकास घडवला, असे ते म्हणाले. तीन महिन्यांत कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन सरकारच्या विकासकामांचा लेखाजोखा मतदारसंघासमोर मांडवा, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसच्या काळात कामे आणि योजनांमध्ये भ्रष्टाचार होत होता, तर आता योजनांचे पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतात, असे सांगून दोन्ही पक्षांतील फरक स्पष्ट केला. आगामी काळात नारीशक्ती अधिनियमची अंमलबजावणी होऊन महिलांना राजकारणात मोठे स्थान मिळेल, असेही त्यांनी सांगितले. लोकशाहीला आव्हान देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप करत नबीन यांनी 'लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव' हा अभियान राबवण्याचे आवाहन केले. पराभवामुळे विरोधक सैरभैर झाले असून, ते पंतप्रधानांवर टीका करत असल्याचे ते म्हणाले.

११० दिवसांनी विधानसभा निवडणूक : मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीला ११० दिवस उरले असून, पुढील तीन महिने कार्यकर्त्यांनी सक्रिय होऊन काम करावे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोव्याच्या विकासावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे चौथ्यांदा सत्तेत येऊन पंतप्रधानांचे हात बळकट करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. विरोधक काय करतात, याकडे लक्ष न देता निवडणूक जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन भाजप सरकारच्या विकासकामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. अनेकदा एसआयआर झालेला असतानाही काँग्रेस आता त्याला विरोध करत आहेत, कारण आपला विजय शक्य नसल्याते त्यांना कजून चुकले आहे, अशी टीका डॉ. सावंत यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT