मडगाव : विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हा पंचायतींच्या निवडणुकीत राजकीय रंग गडद होऊ लागला आहे. यंदा विरोधकांपेक्षा सत्ताधारी भाजपाला स्वपक्षातील अंतर्गत बंडाचा मोठा फटका बसत असून अनेक मतदारसंघांत बंडखोरीचे सूर अधिकच तीव्र झाले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि आमदार स्वतः प्रचारात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सांगेच्या रिवण मतदारसंघात समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई तर कुडचडेच्या शेल्डे मतदारसंघात आमदार निलेश काब्राल यांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ मोर्चा उघडला आहे. प्रस्थापितांचे वर्चस्व टिकवण्यासाठी दोन्ही नेते वैयक्तिक पातळीवर लक्ष घालत आहेत.
भाजपाला विरोधकांकडून मोठे आव्हान नसले तरी स्वपक्षातील नाराज कार्यकर्ते आणि स्वतंत्र उमेदवारांनी समीकरणे क्लिष्ट केली आहेत. काँग्रेस पक्षाने अद्याप काही महत्त्वाच्या ठिकाणी उमेदवारी जाहीर न केल्यामुळे अंतर्गत मतभेद उफाळले असून ‘आतूनच गुप्त कुरापती’ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या निवडणुकीकडे सर्वच पक्षांचे विशेष लक्ष लागले आहे. जिल्हा पंचायत ही विधानसभा निवडणुकीची पहिली परीक्षा मानत विरोधक काँग्रेस, आप, आरजी तसेच काही स्थानिक गट भाजपाला रोखण्यासाठी एकत्र येण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र उमेदवारीचे गणित सांभाळताना अनेक ठिकाणी मतभेद उघडकीस येत असून विरोधकांची एकजूट अद्यापही कागदावरच असल्याचे चित्र आहे.
मतदारांपर्यंत पोहोचण्याची मोहीम जोरात
दरम्यान, भाजपने बूथस्तरापासून संघटनात्मक हालचालींना वेग देत महाजनसंपर्क बैठकींमार्फत मतदारांपर्यंत पोहोचण्याची मोहीम जोमात सुरू केली आहे. आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्याच्या निर्धाराने मंत्री आमदारांनी थेट रस्त्यावर उतरल्याने निवडणूक रंगतदार बनली आहे. आगामी काही दिवसांत प्रचाराची धामधूम आणखी वाढणार असून, जिल्हा पंचायत निवडणुकीतूनच भविष्यातील विधानसभा रणधुमाळीची दिशा ठरणार असल्याने ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे.