गोवा

BJP Workers Drive Growth-कार्यकर्त्यांमुळेच भाजपची घोडदौड

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक : उद्या अमित शहा घेणार आमदार, नेत्यांची बैठक

पुढारी वृत्तसेवा

पणजी : भारतीय जनता पक्षाची देशात आणि गोव्यामध्ये जी घोडदौड सुरू आहे ती भाजपच्या निःस्वार्थी कार्यकर्त्यामुळे, भाजप कार्यकर्ता हा पक्षाच्या यशाचा शिल्पकार आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले.

पणजी येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळ्येकर व भाजप उत्तर गोवा अध्यक्ष दयानंद कार्बोटकर उपस्थित होते.

नाईक म्हणाले की, रविवारी, दि. ६ रोजी संध्या. ४ वा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पक्षाच्या नव्या मुख्यालयाचे भाजप भवनचे नामकरण आणि लोकार्पण होणार आहे. त्यानंतर अमित शहा भाजपचे आमदार, मंत्री, गाभा समितीचे पदाधिकारी आणि प्रदेश भाजपचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन मार्गदर्शन करणार आहेत.

जनसंघापासून भाजपचे कार्य सुरू

झाले ते आता विस्तारले आहे, असे नमूद करून नाईक यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आदींनी गोव्यात पक्षाचा पाया घातला. त्यानंतर खासदार सदानंद शेट तानावडे, माजी खासदार विनय तेंडुलकर आर्दीनी पक्षाच्या बांधणीत कार्य केले. त्यामुळे पक्ष २०१२ पासून सलग सत्तेत आहे, असे नाईक यांनी स्पष्ट केले.

२०२७ नंतरही मोफत सिलिंडर

हे भाजपने आपल्या २०२२ च्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली बहुतांश सर्वच आश्वासने पूर्ण केली. मोफत तीन सिलिंडर देण्याचे आश्वासनही पूर्ण होत आहे. भाजपचे सरकार दिलेली आश्वासने पाळते. त्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सरकारमधील मंत्री यांचे पक्ष अभिनंदन करत असल्याचे सांगून २०२७ च्या निवडणुकीनंतर मोफत तीन गॅस सिलिंडर देण्याची योजना बंद होणार नाही, ती सुरूच राहणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

एकही योजना बंद केलेली नाही...

भाजपच्या सरकारने २००२ मध्ये सुरू केलेली दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आजही चालू आहे. २०१२ मध्ये सुरू केलेली गृह आधार आणि लाडली लक्ष्मी योजनाही सुरू आहे. कोविड काळात आर्थिक संकट येऊनही भाजप सरकारने सर्व योजना सुरू ठेवल्या. काँग्रेसने एकही योजना सुरू केलेली नाही. त्यामुळे लोकाचा भाजपवर विश्वास वाढत आहे, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT