Goa Night Club Fire Case | गोवा पर्यटनाला गालबोट File Photo
गोवा

Goa Night Club Fire Case | हडफडे नाईट क्लब आगीवर चौकशी अहवाल सादर; प्रशासनिक त्रुटींवर ठपका

Goa Night Club Fire Case | हडफडे अग्नितांडवाचा चौकशी अहवाल सरकारला सादर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण आगीप्रकरणी नेमण्यात आलेल्या दंडाधिकारी चौकशी समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. या आगीत झालेल्या दुर्घटनेला प्रशासकीय आणि नियमांच्या त्रुटींवर गंभीर ठपका ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. अहवाल सादर झाल्यानंतर आता दोषींवर सरकार कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबला ६ डिसेंबर रात्री आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची सर्व बाजूंनी व अंगांनी सखोल चौकशी केल्यानंतर समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून, तो राज्याचे मुख्य सचिवांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

चौकशीदरम्यान आगीची कारणे, क्लबला देण्यात आलेली परवाने व मंजुरी, तसेच नियम व अटींचे पालन झाले होते की नाही, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, अहवालात विविध शासकीय विभाग आणि यंत्रणांकडून परवानग्या देताना झालेल्या गंभीर त्रुटी अधोरेखित करण्यात आल्या आहेत.

आवश्यक निकष पूर्ण न करता क्लबला सुरू ठेवण्याची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये संबंधित पंचायतीवर मोठ्या प्रमाणात जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, इतर संबंधित प्राधिकरणांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. समितीने चौकशीदरम्यान संबंधित व्यक्ती व अधिकाऱ्यांची जबानी नोंदवली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक व सुधारात्मक उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत नाईट क्लबला भीषण आग लागली होती. या भीषण आगीच्या घटनेचे पडसाद राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर उमटले होते व राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले होते. या आगीत एकूण २५ जणांचा मृत्यू झाला होता त्यापैकी २० जण क्लबचे कर्मचारी तर पाच जण पर्यटक होते. घटनेनंतर सरकारने उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्या अध्यक्षतेखाली दंडाधिकारी चौकशी समितीची स्थापना केली होती. ८ डिसेंबर रोजी स्थापन झालेल्या या समितीला सात दिवसांत

अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते मात्र ते शक्य झाले नसल्याने त्याला दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. या हडफडे दुर्घटनेप्रकरणी सरकारने २४ तासांत माजी पंचायत संचालक, माजी राज्य प्रदूषण नियंत्रण सदस्य सचिव, माजी सचिव या तिघांना तडकाफडकी निलंबित केले होते. तसेच नाईट क्लबच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांना अटक केली होती. त्यानंतर या नाईट क्लबचे मालक सौरभव गौरव लुथरा बंधू त्याच रात्री दुर्घटनेची माहिती मिळताच थायलंडला पलायन केले होते.

केंद्रीय यंत्रणा व गोवा पोलिसांनी संयुक्तरित्या या बंधूंना गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सुमारे ९ दिवसांनंतर या बंधूंना गोव्यात आणण्यात आल्यावर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आला.

गोवा पोलिसांनी केलेल्या चौकशीत या नाईट क्लबसाठी आवश्यक असलेले परवाने बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. अबकारी परवान्यासाठी आरोग्य केंद्राचे बोगस प्रमाणपत्राचा वापर केल्याने म्हापसा पोलिसात लुथरा बंधू व अजय गुप्ता याच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

जमीन मालक सुरेंद्र खोसला अद्याप फरार...

या दुर्घटनाप्रकरणी आतापर्यंत हणजूण पोलिसांनी ९ संशयितांपैकी ८ जणांना अटक केली आहे. या नाईट क्लब असलेल्या जमिनीचा मालक सुरेंद्र खोसला अजून फरार असून तो युकेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या माहितीच्या आधारे त्याच्या विरुद्ध ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करून इंटरपोल यंत्रणेमार्फत त्याचा शोध सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT