बर्च बाय रोमियो लेन आग दुर्घटनेतील २५ बळींपैकी २१ जणांची शवविच्छेदन तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये १६ कर्मचारी आणि पाच पर्यटकांचा समावेश आहे. सर्व २१ मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत आणि त्यांच्या मूळ ठिकाणी रवाना करण्यात आले आहेत. १९ जणांचा मृत्यू श्वासोच्छवास घेण्यात अडचणी येऊन गुदमरल्याने झाला.
दोघांचा मृत्यू जागीत होरपळल्याने झाला. नेपाळमधील दोन मृत व्यक्तींची शवविच्छेदन तपासणी सध्या सुरू आहे. हडफडे-नागोवा सरपंचाची चौकशी, पंचायतीमधून क्लबचे रेकॉर्ड जप्त : बर्च बाय रोमियो लेन आगीच्या चौकशीसंदर्भात हडफडे नागोवाचे सरपंच रोशन रेडकर यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून पंचायत कार्यालयातून सर्व्हे क्रमांक १५०/० शी संबंधित सर्व कागदपत्रे आणि रजिस्टर देखील जप्त केले आहेत. मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द आणि सरकार यांच्यात समन्वय साधण्याचे काम चार एजन्सींवर सोपवण्यात आले. आपणास नेपाळ दूतावासाकडून बळींचे मृतदेह परत आणण्यासाठी मदत करण्याचे फोन आले आहेत, असे यादव यांनी सांगितले.
८५ लाखांची मदत गोवा सरकारने हडफडे येथील दुःखद आगीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या १७ जणांच्या कायदेशीर वारसांना आणि जवळच्या नातेवाईकांना ८५ लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. उर्वरित मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही ही मदत दिली जाणार आहे.
राज्यात दिल्लीतील उद्योजक गोव्यात असलेल्या आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांना हाताशी धरून नेहमीच अवैध व्यवसाय करत असतात हे सर्वश्रुत आहे. हडफडे येथील नाईट क्लबविरोधात गोवा पोलिसांनी चौकशी व कारवाई करण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या.
मात्र एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने या अधिकाऱ्यांवर दबाव आणून हस्तक्षेप केला होता, त्यामुळे हा निवृत्त आयपीएस अधिकारी कोण अशी चर्चा पोलिस वर्तुळातच सुरू झाली आहे. गोवा सरकार व आयपीएस अधिकारी या हस्तक्षेप करणाऱ्या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाई करणार का, याकडे लोकांचे लक्ष आहे.