पणजी : पुढारी वृत्तसेवा हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईट क्लबला शनिवारी रात्री लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या २५ पैकी २१ जणांचे मृतदेह राज्य सरकारने त्यांच्या मूळ गावी झारखंड, उत्तराखंड, ओरीसा, प. बंगाल व नेपाळला पोहोचवले, तर ४ मृतदेहांसाठी वैद्यकीय परीक्षक कार्यालय नेपाळमधील या व्यक्तींच्या कुटुंबीयांकडून शवविच्छेदन करण्यासाठी मंजुरीची वाट पाहत आहे आणि त्यानंतरच त्यांचे मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केले जाऊ शकतात, अशी माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिली.
सरकारने राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून पीडितांचे मृतदेह त्यांच्या घरी पोचवण्यासाठी वाहतुकीचा संपूर्ण खर्च उचलला आहे. आतापर्यंत जे २१ मृतदेह त्यांच्या गावी पोहोचवले, त्यासाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च केल्याचे यादव यांनी सांगितले. २१ मृत व्यक्तींचे कुटुंबीय गोव्यात आले व मृतदेह घेऊन गेले.
सरकारने मृतदेह वाहतुकीची व्यवस्था केली, असे त्यांनी सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) बांबोळी येथील फॉरेन्सिक औषध आणि टॉक्सिकॉलॉजी फॅकल्टी मॉच्र्युरी विभागात उर्वरित पाच मृतदेह ठेवण्यात आले आहेत.
त्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी कुटुंबाकडून ना हरकत (एनओसी) आवश्यक आहे. मृतांना घरी परत आणण्याचे आणि कागदपत्रांच्या बाबतीत कुटुंबे आणि सरकार यांच्यात समन्वय साधण्याचे काम चार एजन्सींवर सोपवण्यात आले. आपणास नेपाळ दूतावासाकडून बळींचे मृतदेह परत आणण्यासाठी मदत करण्याचे फोन आले आहेत, असे यादव यांनी सांगितले.