पणजी : पुढारी वृत्तसेवा
न्यायालयाने आदेश देऊनही भंडारी समाजाचे प्रश्न सोडवण्याबाबत गोवा सरकार काहीच करत नसल्याचे सांगत सरकारचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यातील भंडारी समाजाच्या काही नेत्यानी पणजी येथील आझाद मैदानावर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
मात्र या आंदोलनाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. उपेंद्र गावकर, काशिनाथ मयेकर, सुनिल सांतीनेजकर आदी नेते आंदोलनात सहभागी झाले होते. संजीव नाईक म्हणाले, भाजप सरकारने व मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी विश्वासघात केला आहे, आमच्या समाजाचे प्रश्न ८ आठवड्यांत सोडवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्देशांकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे.
आमच्या नेत्यांना वारंवार आश्वासने देऊनही, त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. सरकार एका बेकायदेशीर समितीला पाठिंबा देत आहे, असा दावा करून भंडारी समाजात दोन गट नाहीत, आम्ही एखसंघ आहोत. असे नाईक म्हणाले.
त्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही : देवानंद नाईक
आमची समिती कायदेशीर असताना तिला बेकायदेशीर म्हणून लोकांची दिशाभूल करणारी ही मंडळी आहे. त्यांनी एक समिती स्थापन केली व सहा महिन्यांत अध्यक्ष बदलले. ते कसे काय? या लोकावर भंडारी बांधवांचा विश्वास नाही म्हणून आजच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही, असे गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष देवानंद नाईक यांनी सांगितले.