Housing Project Controversy Goa Pudhari File Photo
गोवा

Housing Project Controversy Goa | झाडांची कत्तल, डोंगर फोडीबाबत बेतकी-खांडोळा पंचायत अनभिज्ञच

Housing Project Controversy Goa | बेतकी-खांडोळा पंचायतीच्या ग्रामसभेत वृक्षतोड, डोंगर सपाटीकरण आणि स्थानिक समस्यांवरून जोरदार चर्चा; 'पुढारी'च्या वृत्ताची दखल घेत ग्रामस्थांनी विचारला जाब

पुढारी वृत्तसेवा

माशेल : पुढारी वृत्तसेवा

बेतकी-खांडोळा पंचायतीच्या ग्रामसभेत तळेवाडा परिसरातील कथित वृक्षतोड व डोंगर सपाटीकरण, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, रस्ते रुंदीकरण, प्रस्तावित विकास प्रकल्प आणि आरोग्य सुविधांसह विविध स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर ग्रामस्थांनी पंचायतीला धारेवर धरत उत्तरांची मागणी केली.

दरम्यान, पुढारीत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा आधार घेत ग्रामस्थांनी सरपंच व पंचांना ग्रामसभेत जाब विचारला. सरपंच श्रद्धा फडते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेला पंच सदस्य विशांत नाईक, संजीवनी तळेकर, शेखर धाडी, निकिता फडते, मनोज गावकर, रमिता गावडे तसेच पंचायत सचिव विनोद शेटकर उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करण्यात आले.

तळेवाडा येथे बागायतीच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित वृक्षतोड आणि डोंगर सपाटीकरणाच्या कामाकडे पंचायतीचे लक्ष कसे गेले नाही, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. यावर पंच विशांत नाईक यांनी, माहिती मिळताच संबंधित जमीनमालकाला काम बंद करण्याची नोटीस देण्यात आली असून संबंधित सरकारी विभागाने जागेची पाहणी केली आहे.

पुढील कारवाईची माहिती अद्याप प्राप्त झालेली नसल्याचे सांगितले. ॲड. विराज बाक्रे यांनी नवीन बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यापूर्वी पाणी, वीज व अन्य मूलभूत सुविधांची पडताळणी केली जाते का, असा प्रश्न उपस्थित केला.

त्यावर तांत्रिक तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने अशी पडताळणी करता येत नसल्याचे पंचायत सचिवांनी स्पष्ट केले. यावर सरकारकडे तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची मागणी करावी, अशी सूचना बाक्रे यांनी केली.

माशेल-खांडोळा जंक्शन ते बेतकी रस्त्याच्या प्रस्तावित रुंदीकरणामुळे नागरिकांच्या घरांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी मिलिंद फडते यांनी केली. यावर हा विषय उच्च न्यायालयाच्या आदेशाशी संबंधित असल्याने पंचायत हस्तक्षेप करू शकत नसल्याचे पंच विशांत नाईक यांनी सांगितले.

बागवाडा येथे सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या प्रस्तावित निवासी प्रकल्पामुळे विहिरी आणि नैसर्गिक जलस्रोत धोक्यात येण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त करत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. तामसुली येथील गणेश विसर्जन तळ्यावरील लोखंडी कठडा तातडीने दुरुस्त करण्याची मागणीही करण्यात आली.

बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांचा अभाव, रुग्णवाहिकेचा मर्यादित वापर, जलवाहिनी टाकल्यानंतर रस्त्याची न झालेली दुरुस्ती, देवळाय-खांडोळा येथील पारंपरिक विहिरींची दुरुस्ती, सीसीटीव्ही यंत्रणेचा अपुरा उपयोग आणि ढिसाळ कचरा व्यवस्थापन यावरही ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वेळेवर कचरा उचलला गेला नाही तर कचरा पंचायतीसमोर आणून टाकू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.

चर्चेत सरपंचांचा अल्प सहभाग

ग्रामसभेत बहुतांश प्रश्नांना पंच विशांत नाईक आणि पंचायत सचिव विनोद शेटकर यांनी उत्तरे दिली. सरपंचांनी चर्चेदरम्यान फारशी भूमिका न घेतल्याने त्याबाबतही ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT