पणजी : बेती, वेरे, बार्देश परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटर चालवणाऱ्या रॅकेटचा साळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला. संशयितांनी अमेरिकेतील नागरिकांची तूर्त सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि नागालँड येथील नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कॉल सेंटरमधून परदेशातील नागरिकांना तांत्रिक सहाय्य (टेक सपोर्ट) किंवा बैंकिंग सेवांच्या नावाखाली फोन करण्यात येत होते. संशयित आरोपी स्वतःला नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून नागरिकांची वैयक्तिक व आर्थिक माहिती मिळवत आणि त्यानंतर त्यांची फसवणूक करत होते. छाप्यादरम्यान पोलिसांनी संगणक, लॅपटॉप, मोबाईल फोन, इंटरनेट उपकरणे तसेच विविध बनावट कागदपत्रे जप्त केली आहेत.
या रॅकेटद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक चौकशीत या टोळीचे जाळे इतर राज्यांपर्यंत पसरलेले असल्याचे उघड झाले असून आणखी काही संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच, परदेशातील पीडित नागरिकांची माहिती मिळवून फसवणुकीची रक्कम नेमकी किती आहे याचा तपासही सुरू आहे.
या प्रकरणामुळे गोव्यातील सायबर गुन्ह्यांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत असून नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिस निरीक्षक दिनेश गाडेकर यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
यांना झाली अटक...
अटक करण्यात आलेल्यांमध्ये संदीपकुमार प्रियदर्शी (अहमदाबाद, गुजरात), आकाश काळे (मुंबई, महाराष्ट्र), कवीश थारीवाला (अहमदाबाद, गुजरात), अक्षय नायर (ठाणे, महाराष्ट्र), हिरेन भयाणी (मालाड, पूर्व, महाराष्ट्र), अजय किशोर दास (कोलकाता, पश्चिम बंगाल), तन्मय पवार (कांदीवली, पूर्व मुंबई), विकीहो सोहे (दिमापुर, नागालैंड), लहोशेटो रोचील (दिमापुर, नागालैंड) यांचा समावेश आहे.