Vidhansabha Election 
गोवा

Goa: बाणावली मतदारसंघात पुन्हा काँग्रेस-आप लढत?

नेतृत्वाचा अभाव काँग्रेससाठी डोकेदुखी; विद्यमान आमदार वेंझी व्हिएगस यांचे वर्चस्व कायम

पुढारी वृत्तसेवा

सासष्टी : विठू सुकडकर

सासष्टी तालुक्यातील बाणावली विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिकरित्या काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, अंतर्गत बंडाळी, उमेदवारीवरून निर्माण होणारे वाद आणि वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयांमुळे अनेकदा काँग्रेसच्या हातून हा मतदारसंघ निसटला आहे. त्यामुळे आगामी २०२७ विधानसभा निवडणुकीतही काँग्रेससमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे पक्षातील अंतर्गत मतभेद आणि सक्षम नेतृत्वाचा अभाव हेच राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र २०२७ च्या निवडणुकीत काँग्रेस आणि आपमध्येच खरी लढत होणार आहे.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राजकीयदृष्टना अपरिचित असलेल्या तियात्रिस्त टोनी डायस यांना ऐनवेळी उमेदवारी दिली. या निर्णयाचा थेट फायदा आम आद‌मी झाला आणि त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवत इतिहास घडविला. यापूर्वीही चर्चिल आलेमाव यांनी युनायटेड गोवन्स डेमोक्रेटिक पार्टी (यूजीडीपी), सेव्ह गोवा फ्रंट तसेच मिकी पाशेको यांनी विविध प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारीवर निवडणूक लढवत काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला भगदाड पाडले होते.

२०२२ च्या निवडणुकीत तत्कालीन विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या निर्णयशैलीमुळे काँग्रेसला बाणावलीची जागा गमवावी लागल्याची भावना आजही अनेक कार्यकर्त्यांमध्ये आहे. सध्या दिगंबर कामत भाजपमध्ये असले तरी गिरीश चोडणकर पुन्हा गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाल्याने मतदारसंघातील अनेक ख्रिस्ती मतदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. पुन्हा उमेदवारीबाबत चुकीचा निर्णय समर्थक व्यक्त करत आहेत.

सध्या बाणावलीचे प्रतिनिधित्व करणारे वैझी व्हिएगस यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात विविध विकासकामे राबविण्याबरोबरच नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. विकासकामांसह वैयक्तिक स्तरावर अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्याबाबत मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण असल्याचे दिसते.

विशेष म्हणजे, एकेकाळी काँग्रेसशी निष्ठावान असलेला मतदारवर्ग आता मोठ्या प्रमाणावर आपकडे वळल्याचे दिसते. काँग्रेसमधील नेतृत्वाचा अभाव आणि अंतर्गत मतभेद कायम राहिल्यास आगामी निवडणुकीत वेंझी व्हिएगस यांना पुन्हा विजयाची संधी मिळू शकते.

बाणावली मतदारसंघात विद्यमान आमदार वेंझी व्हिएगस यांच्यानंतर काँग्रेसच्या उमेद‌वारीसाठी अनेक चॉरेन आलेमाव, केळशीचे सरपंच डिक्सन वाझ, लुईझा रॉड्रिग्ज तसेच मागील विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार टोनी डायस यांचा समावेश आहे. त्यामुळे उमेदवार निवडीचा प्रश्न काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

२०२२ ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर वॉरेन आलेमाव यांनी मतदारसंघात सातत्याने लोकसंपर्क सुरू ठेवला आहे. काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. डिक्सन वाझ आणि लुईझा रॉड्रिग्ज हेही मतदारसंघात सक्रिय असून दोघेही काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे, मागील निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर पराभूत झालेले टोनी डायस यांनीही बंदा पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

राजकीय घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे मिकी पाशेको. गेल्या वर्षभरापासून त्यांनी मतदारसंघात नव्याने जनसंपर्क वाढविला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न केले आणि प्रसारमाध्यमांतूनही काँग्रेस नेतृत्वाकडे सकारात्मक संकेत दिले, मात्र, काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी स्वतंत्र पक्षाच्या उमेदवारीवर बाणावलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दरम्यान, माजी आमदार कायतु सिल्वा यांनीही अलीकडील काळात मतदारसंघात पुन्हा सक्रियता वाढविली आहे. मतदारांशी संपर्क वाढविल्यामुळे तेही निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे संकेत मिळत आहेत.

दुसरीकडे, बाणावलीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी यंदाची विधानसभा निवडणूक बाणावलीतून न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत असून काँग्रेस, आप आणि इतर इच्छुक उमेदवारांमधील लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

वेंझीच्या काँग्रेस प्रवेशाला पुन्हा विराम?

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आपचे आमदार वैझी व्हिएगस हे चांगले मित्र आहेत. युरी आलेमाव यांनी वैझी व्हिएगस यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्याबाबत दोघांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचेही बोलले जात होते. वेंझी व्हिएगस यांनीही काँग्रेस प्रवेशाबाबत उत्सुकता दाखविल्याची चर्चा होती. मात्र, गिरीश चोडणकर यांची पुन्हा गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर हे समीकरण बदलल्याचे मानले जाते. मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी वाटपाबाबत झालेल्या निर्णयांमुळे काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत वेंझी व्हिएगस यांनी आपली भूमिका बदलल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT