वास्को : पुढारी वृत्तसेवा
बायणा येथील मासळी मार्केटची दुरुस्ती करून तेथे घाऊक मासे विक्रेत्यांची व्यवस्था करण्याचा निर्णय झाल्यानंतर स्थानिक मासळी विक्रेत्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, मार्केटाची दुरुस्ती न झाल्याने आणि घाऊक विक्रेते तेथे स्थलांतरित न झाल्याने विक्रेत्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.
ग्राहकांची वर्दळ नसल्याने व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याची खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. बायणा मासळी मार्केटाची गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. प्रत्येक निवडणुकीत या मार्केटाच्या दुरुस्तीची आश्वासने दिली जातात; मात्र त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला. आहे.
वेळोवेळी पालिका अधिकारी आणि संबंधित लोकप्रतिनिधी मार्केटाची पाहणी करून दुरुस्तीचे आश्वासन देतात; परंतु त्यानंतर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पूर्वी या मार्केटात भाजीपाला, नारळ आणि मासे विक्रेते मोठ्या संख्येने व्यवसाय करत होते. मात्र, भाजी विक्रेत्यांच्या विभागावरील छप्पर कोसळल्यानंतर अनेकांनी मार्केट सोडून रस्त्याच्या कडेला किंवा इतर ठिकाणी व्यवसाय सुरू केला.
दुसऱ्या भागात सुमारे १५ ते १६ मासळी विक्रेते व्यवसाय करत होते. परंतु, रस्त्यावर अतिक्रमण करून सुरू झालेल्या मासेविक्रीमुळे ग्राहकांचा ओढा मार्केटकडे कमी झाला आणि कालांतराने मार्केटातील विक्रेत्यांची संख्या निम्म्यावर आली. छपराची मोडतोड झाल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गळती होते.
त्यामुळे अशा परिस्थितीत व्यवसाय करणे कठीण बनले असून सध्या केवळ दोन-तीन विक्रेत्या कसाबसा व्यवसाय टिकवून धरत आहेत. रस्त्यावरील अतिक्रमणांवन कारवाई होत नसल्याने मार्केटातील विक्रेत्यांना त्याचा मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले. मार्केटाची तातडीने दुरुस्ती करून रस्त्यावरील अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांना नियोजित जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक विक्रेत्यांनी केली जात आहे.
घाऊक मासे विक्रेते स्थलांतर प्रस्ताव रखडला
मुरगाव पालिकेने बायणा मासळी मार्केट अधिसूचित केले असूनही आवश्यक सुविधा आणि दुरुस्तीची कामे अद्याप झालेली नाहीत. काही महिन्यांपूर्वी घाऊक मासे विक्रेत्यांना या मार्केटात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर मार्केटाची पाहणीही झाली; मात्र घाऊक विक्रेत्यांनी तेथे व्यवसाय करण्यास अनुत्सुकता दर्शवल्याने हा प्रस्ताव रखडल्याचे सांगितले जाते.