elephant 
गोवा

Goa News | 'बाहुबली' परतला! वर्चस्वाच्या लढाईनंतर दिग्गज हत्ती पुन्हा कळपाचा राजा; 'गणेश' बाहेर

Goa News | कळपापासून दूर जात एकांडा (एकटा) राहणारा बाहुबली हत्ती पुन्हा एकदा कळपात परतला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

कळपापासून दूर जात एकांडा (एकटा) राहणारा बाहुबली हत्ती पुन्हा एकदा कळपात परतला आहे. ओंकार हा बाहुबली आणि कळपातील मोठ्या मादीचे अपत्य. कित्येक महिन्यांनी बाहुबलीची आणि या दोघांची भेट झाली असून सध्या या तिघांचे कुटुंब केर परिसरातील जंगल भागात रमले आहे.

गणेश आणि बाहुबली या दोन्ही हत्तींमधील (टस्कर) वर्चस्वाच्या लढाईनंतर कळपाचा ताबा बलाढ्य बाहुबलीकडून गणेशकडे गेला होता. त्यानंतर बाहुबली एकटाच दोडामार्ग चंदगड तालुक्यात फिरत होता. जवळपास वर्षभराने परिस्थिती बदलली असून बाहुबली पुन्हा कळपात सामील झाला आहे, तर गणेश कळपातून बाहेर पडला आहे.

आता कळपाचा ताबा पुन्हा एकदा बाहुबलीकडे आला असून या कळपात ओंकारसह मोठी मादी, छोटी मादी आणि दोन पिल्ले आहेत. दि. १६ रोजी दुपारी ३.४७मिनिटांनी बाहुबली आणि ओंकार गावात एकत्र आले.

तेथून ते दोघे पिता पुत्र केर घाडवस मंदिराच्या दिशेने गेले. त्यानंतर ते दोघे ४.४० वा. मोठी मादी (ओंकारची आई), छोटी मादी आणि दोन पिल्लांना जाऊन केरमध्ये मिळाले. यावेळी कळपापासून दूर गेलेला गणेश ४.२५ वा. पाळ्येत व नंतर घोटगेवाडीच्या जवळ पोचला होता. त्यानंतर ६.२८ मिनिटांनी गणेश दोडामार्ग कोल्हापूर मार्गावरील तिळारी येथील मुख्य पुलाच्या खालच्या बाजूला नदीत होता.

काय होणार, युद्ध की युद्ध विराम? बाहुबली आणि गणेश यांच्यात कळपाच्या नेतृत्वावरून हेवाळे येथील श्रीराम मंदिराच्या विरुद्ध दिशेला अननसाच्या बागेत व बाजूच्या जंगल भागात तुंबळ युद्ध झाले होते. वन विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्यात ते कैद झाले होते. युद्धानंतर बाहुबली कळपातून बाहेर पडला आणि गणेशने कळपाचा ताबा घेतला होता.

बाहुबली - ओंकारची १० महिन्यांनी भेट

गेल्यावर्षी ८ एप्रिलला मोर्लेमध्ये ओंकार हत्तीच्या हल्ल्यात लक्ष्मण गवस (वय - ७०) मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर ओंकारला पकडण्याचे आदेश प्रधान मुख्य वन संरक्षकांनी दिले होते. त्यानंतर काही काळ ओंकार आणि बाहुबली एकत्र फिरत होते. काही दिवसांत त्यांची ताटातूट झाली. ओंकार गोव्यात पोचला. तिथून सावंतवाडी तालुक्यातून पुन्हा दोडामार्गमध्ये आला. मात्र, या काळात बाहुबली व त्याची भेट झाली नव्हती. ती आज झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT