प्रशांत वाघाये : पणजी
Goa Ayurveda Day celebration : आयुर्वेदाला केवळ पर्यायी उपचार म्हणून नव्हे तर एक व्यापक आरोग्य सेवा प्रणाली म्हणून ओळखले जाते, प्रतिपादन गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी केले. तर लवकरच योगप्रमाणे आयुर्वेद दिवस (Ayurveda Day) जगभरात साजरा केला जाईल, असा आशावाद गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Pramod Sawant) यांनी आज (दि. २३) व्यक्त केला. भारताला ग्लोबल वेलनेस कॅपिटल बनवायचे आहे आणि गोव्यासारखी राज्य यामध्ये मोठी मदत करतील. आणि आयुष औषधी स्वस्त मिळावेत म्हणून लवकरच आयुष औषधी केंद्र सुरू करत आहोत. त्यामुळे आयुषची सर्व औषधी एकाच छताखाली मिळतील, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत दहाव्या आयुर्वेद दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्वी विविध नव्या सुविधांचे गोव्यातील आयुर्वेद संस्थानात उद्घाटन करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोव्याची संस्कृती दाखवणारे नृत्य सादर करण्यात आले. तत्पूर्वी आयुर्वेदात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शारीरिक प्रात्यक्षिके साकारली.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, आयुर्वेदासाठी खऱ्या अर्थाने अच्छे दीन आले आहेत. आयुषचे स्वतंत्र मंत्रालय झाले आहे, अनेक नवनव्या गोष्टी घडत आहेत. भारत सरकारला अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांनचा विस्तार करायचा असेल तर आम्ही त्यांना जागा देण्याबाबत विचार करू. अखिल भारतीय आयुर्वेद ज्ञान संस्थान गोवा येथे बाह्य रुग्ण विभागात ८०० रुग्ण प्रति दिवस येतात, ही एक मोठी उपलब्धी असून उपचारासाठी हे भारतातील एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे. काही वर्षांनी हे जगातील लक्षवेधी केंद्र असेल. दरम्यान श्रीपाद नाईक आयुष्य विभागाचे मंत्री असताना त्यांनीही उत्तम काम केले, असे कौतुकोद्गार त्यांनी श्रीपाद नाईक यांच्याबद्दल काढले. दरम्यान, लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि अनेक आजारांसाठी कारण बनत आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
प्रतापराव जाधव म्हणाले की, २३ सप्टेंबर या विशिष्ट दिवसामुळे वैश्विक कॅलेंडरमध्ये आयुर्वेद दिनाला एक वेगळी ओळख मिळाली. मागील वर्षी प्रकृती परीक्षण अभियान पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुरू ककरण्यात आले. १ कोटीपेक्षा अधिक लोकांचे प्रकृती परीक्षण ह्यात करण्यात आले. यात पहिले परीक्षण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. तसेच मागील १२ वर्षात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आयुष मंत्रालयाने मोठी प्रगती केली आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थासह आम्ही करार केले आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार होतात. या पार्श्वभूमीवर आयुष आहाराचे महत्त्व आणखी अधोरेखित होते, असेही जाधव म्हणाले. यावेळी आयुर्वेदामध्ये उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रतिष्ठित राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार २०२५ बनवारी लाल गौर, व्ही. नीलकंठन मूस ई.टी. आणि व्ही. भावना पराशर यांना प्रदान करण्यात आले.