पणजी : येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनासाठीची तयारी आणि रणनीती विरोधकांसह सत्ताधार्यांनीही केल्याने हे पावसाळी अधिवेशन गाजणार यात शंका नाही. यासाठी आमदारांकडून तब्बल 750 तारांकित आणि 3 हजार 330 अतारांकित प्रश्न आले आहेत, अशी माहिती विधानसभेच्या सचिव नम्रता उलमन यांनी दिली आहे.
विधानसभेत लोकांचे प्रश्न मांडले जावेत आणि सरकारने ते सोडवावेत यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मंगळवारी विधानसभेत विरोधी आमदारांची बैठक घेत सरकारला विविध मुद्द्यांवर धारेवर धरण्याची तयारी केली आहे. या बैठकीला विरोधकांपैकी गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई आणि आरजी पक्षाचे वीरेश बोरकर हजर राहिले नव्हते. दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली पणजीत विशेष बैठक बोलावली होती. याला भाजपसह घटक पक्ष मगो आणि अपक्ष आमदार हजर होते.
या बैठकीतील सविस्तर तपशील मिळाला नसला तरी सत्ताधार्यांनीही विरोधकांच्या आक्रमक भूमिकेला जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. पावसाळी अधिवेशनासाठी विरोधकांसह सत्ताधार्यांनीही मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले आहेत. प्रत्येक मतदारसंघातील प्रश्नांना विधानसभेत उत्तर मिळाले पाहिजे, अशी सत्ताधारी आमदारांची मागणी आहे. त्यामुळे विरोधकांचे प्रश्न किती चर्चेला येणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावेळी विविध आमदारांकडून तब्बल 750 तारांकित आणि 3 हजार 330 अतारांकित प्रश्न आले आहेत. त्यामुळे यावेळी विरोधक सक्रीय झाले आहेत.
जनतेच्या प्रश्नांसाठी विधानसभा अधिवेशनात आम्ही आक्रमक असू. सरकारकडून जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे, ही थांबवणे हे विरोधक म्हणून आमचे कर्तव्य आहे. सर्व विरोधकांनी एकत्र यावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सरकारने कितीही लपवा-छपवी केली तरी विधानसभा पटलावर त्यांना उघडे पाडू.युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.