Arpita Gavas Actress 
गोवा

Arpita Gavas Actress | औपचारिक प्रशिक्षणाशिवाय रंगभूमीवर उमटवला ठसा; मोर्ले-सत्तरीच्या अर्पिता गावस यांची प्रेरणादायी वाटचाल

Arpita Gavas Actress | मुंबई आणि गोवा अशा दोन भिन्न सांस्कृतिक वातावरणात बालपण गेलेल्या आणि विवाहानंतर मोर्ले-सत्तरी येथील अर्पिता सागर गावस यांनी कोणतेही औपचारिक अभिनय प्रशिक्षण न घेता ग्रामीण रंगभूमीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली.

पुढारी वृत्तसेवा

रंगयात्रा - निवृत्ती शिरोडकर

मुंबई आणि गोवा अशा दोन भिन्न सांस्कृतिक वातावरणात बालपण गेलेल्या आणि विवाहानंतर मोर्ले-सत्तरी येथील अर्पिता सागर गावस यांनी कोणतेही औपचारिक अभिनय प्रशिक्षण न घेता ग्रामीण रंगभूमीवर स्वतंत्र ओळख निर्माण केली. निरीक्षण, अनुभव, मेहनत आणि रंगभूमीवरील निष्ठेच्या जोरावर त्यांनी चाळीसहून अधिक नाट्यनिर्मितींमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. हौशी, स्पर्धात्मक, व्यावसायिक आणि दशावतारी रंगभूमीबरोबरच शॉर्ट फिल्म्स, म्युझिक व्हिडीओ, अल्बम आणि चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या प्रवासामागे संघर्ष, कुटुंबाचा आधार आणि रंगदेवतेवरील श्रद्धा आहे.

अर्पिता यांचे बालपण मुंबई आणि गोवा येथे गेले. इयत्ता पहिलीपर्यंतचे शिक्षण मुंबईत, तर त्यानंतरचे शिक्षण गोव्यात झाले. आई, वडील, भाऊ आणि त्या अशा कुटुंबात त्यांची जडणघडण झाली. वडील, काका आणि आजोबा नाटकांत काम करायचे. त्यांच्या नाट्यप्रयोगांच्या आठवणी, घरातील रंगभूमीविषयक चर्चा आणि प्रत्यक्ष पाहिलेले प्रयोग यांतून लहानपणीच अभिनयाचे बीज त्यांच्या मनात रुजले.

घरातील ज्येष्ठांना रंगमंचावर पाहताना 'आपणही एक दिवस नाटकात काम करायचे,' ही इच्छा निर्माण झाली आणि पुढे याच इच्छेने त्यांच्या नाट्यप्रवासाचा पाया घातला. वयाच्या तेराव्या वर्षी खोकरल गावात सादर झालेल्या 'अमृतमोहिनी' नाटकातील 'मोहिनी' या भूमिकेतून त्यांनी रंगमंचावर पहिले पाऊल ठेवले. लहानपणापासून नृत्याची आवड असल्याने त्यांची या भूमिकेसाठी निवड झाली.

फॅन्सी ड्रेस, एकपात्री अभिनय आणि शालेय सांस्कृतिक उपक्रमांत त्या आधीपासून सहभागी होत असल्याने रंगमंचाची भीती वाटली नाही. पहिल्याच प्रयोगाने त्यांना आनंद, आत्मविश्वास आणि नवी ओळख दिली. त्यानंतर 'निष्पाप' या सामाजिक नाटकात त्यांनी 'गौरी'ची प्रमुख भूमिका साकारली. या भूमिकेने अभिनेत्री म्हणून त्यांना अधिक आत्मविश्वास दिला.

अभिनयाचे औपचारिक प्रशिक्षण त्यांनी घेतले नाही. प्रत्येक तालीम, प्रयोग, दिग्दर्शकाची सूचना, सहकलाकारांचे निरीक्षण आणि प्रेक्षकांची प्रतिक्रिया यांनाच त्यांनी प्रशिक्षण मानले. त्यांच्या नाट्यप्रवासात आईचे स्थान सर्वात महत्त्वाचे आहे. वासुदेव गावस, शिवनाथ नाईक, नीलेश महाले, ज्ञानेश्वर पार्सेकर, प्रभाकर नाईक गुरुजी, विठ्ठल गावस, विशाल गावस, विनय गावस, रामा राऊत, शाबलो गावकर आणि वैभव नाईक यांच्यासह अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि ज्येष्ठ रंगकर्मींचे मार्गदर्शन त्यांना लाभले. अभिनयातील बारकावे, आत्मविश्वास, शिस्त, वेळेचे भान आणि कलेप्रती निष्ठा त्यांनी आत्मसात केली.

ग्रामीण भागातील स्त्री कलाकार म्हणून रंगमंचावर येताना त्यांना टोमण्यांना सामोरे जावे लागले. 'नाटकात काम करते म्हणजे भरपूर पैसे मिळत असतील', 'रात्री-अपरात्री घरी येते' अशा टीका टिप्पणींना तोंड द्यावे लागले. मात्र, आई-वडील आणि भावाने पूर्ण विश्वास दिला. त्यामुळे समाजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्या कलेवर लक्ष केंद्रित करू शकल्या.

कालांतराने समाजाचा दृष्टिकोन बदलला. पूर्वी स्त्रियांनी नाटकात काम करण्याकडे संशयाने पाहिले जात असताना आज त्यांच्या प्रतिभेचे आणि मेहनतीचे कौतुक केले जाते. अर्पिता यांच्या यशामागे आईचे योगदान विशेष आहे. सुरुवातीला आईच्या पाठिंब्यामुळे नाटकात जाता आले. नऊवारी नेसवणे, मेकअप, केशरचना आणि प्रयोग संपेपर्यंत जागून नाटक पाहणे ही जबाबदारी ती पार पाडत असे. वडील आणि भावानेही खंबीर साथ दिली.

रात्री उशिरा प्रयोगावरून परतणाऱ्या बहिणीसाठी भाऊ जागा राहायचा. लग्नानंतरही नाट्यप्रवास थांबला नाही. त्यांचे पती नाटकांना पार्श्वसंगीत देत असल्याने रंगभूमीची आवड आणि तालीमीसाठी लागणारा वेळ यांची त्यांना जाणीव आहे. दीर, जाऊबाई आणि आनंद नांदोडे यांनीही नाटकात काम केले आहे, तर सासूबाईंचाही पाठिंबा आहे. 'तू कर, मी आहे तुझ्यासोबत,' हे पतीचे शब्द त्यांच्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोलाचे आहेत.

'इथे ओशाळला मृत्यू' या नाटकातील येसूबाईंची भूमिका त्यांच्या मनाच्या सर्वाधिक जवळची आहे. येसूबाईंचे धैर्य, संघर्ष आणि कणखर व्यक्तिमत्त्व त्यांना प्रेरणा देत आले. ही भूमिका साकारण्यासाठी केवळ दोन दिवस आणि एकच तालीम मिळाली. त्यांनी दोन दिवसांत संपूर्ण भाषण पाठ केले. वासुदेव गावस यांच्या दिग्दर्शनाखाली होंडा येथे ही भूमिका साकारली.

प्रयोगानंतर प्रेक्षकांनी दिलेली उत्स्फूर्त दाद त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरली. 'अनेक येसूबाई पाहिल्या; पण ही येसूबाई काही औरच होती!' अशी प्रतिक्रिया मिळाली.
कोकणी नाट्यस्पर्धेतील 'काणी तशी जुनीच... पण?' या नाटकात त्यांनी एकाच वेळी सूत आणि 'सातेरकार चेडू' अशा दोन परस्परविरोधी भूमिका साकारल्या.

दोन्ही व्यक्तिरेखांची देहबोली, आवाज आणि स्वभाव वेगळा ठेवणे आव्हान होते. शाबलो गावकर आणि वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दोन्ही व्यक्तिरेखांचा अभ्यास केला. 'सातेरकार चेडू' या भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयाचे प्रशस्तीपत्र मिळाले.

'शिव-पार्वती युद्ध' या दशावतारी नाटकातील प्रसंग त्यांच्या नाट्यनिष्ठेची साक्ष देणारा आहे. डिचोली, महाराष्ट्र येथे त्यांचा पहिला दशावतारी नाट्यप्रयोग होता आणि त्यात त्या पार्वतीची प्रमुख भूमिका साकारत होत्या. प्रयोग सुरू होण्यापूर्वी आईची तब्येत अचानक बिघडली आणि तिला रुग्णालयात नेण्यात आले.

एका बाजूला आईची काळजी आणि दुसरीकडे रंगमंचावरील जबाबदारी असताना त्यांनी स्वतःला सावरून पार्वतीची भूमिका पूर्ण ताकदीने साकारली. 'त्या परिस्थितीत मी भूमिका कशी केली, हे माझे मलाच माहित नाही. कदाचित रंगभूमीवरील प्रेम आणि नटेश्वराचा आशीर्वाद यामुळेच ते शक्य झाले,' असे त्या सांगतात.

आजवर चाळीसहून अधिक नाट्यनिर्मितींमध्ये काम करताना त्यांनी शेकडो प्रयोग सादर केले. नाट्यस्पर्धा, व्यावसायिक नाटके आणि तीन दशावतारी नाटकांचा त्यात समावेश आहे. वरदहस्त क्रिएशन, केरी-सत्तरी या संस्थेसोबत त्यांनी पाच व्यावसायिक नाटकांत काम केले असून प्रत्येकाचे शंभरहून अधिक प्रयोग झाले आहेत.

त्यांच्या उल्लेखनीय नाटकांमध्ये 'अयोध्याचा राजा', 'एक दिवस अचानक', 'न धरी शस्त्र करी', 'इथे ओशाळला मृत्यू', 'निष्पाप', 'झुंज स्वतःच्या नात्यांची', 'पूर्णविराम', 'शिव-पार्वती युद्ध', 'मोग पैसो करता पिसो' आणि 'सिंह गर्जला राणी' यांचा समावेश आहे. ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिक, विनोदी आणि पौराणिक भूमिकांनी त्यांच्यातील अभिनेत्री अधिक समृद्ध केली आहे.

डिजिटल युगातही रंगभूमीचे महत्त्व:

मोबाईल आणि सोशल मीडियामुळे काही सेकंदांत मनोरंजन उपलब्ध होत असल्याने ग्रामीण रंगभूमीसमोर प्रेक्षकांना प्रत्यक्ष नाट्यप्रयोगाकडे आकर्षित करण्याचे आव्हान आहे. मात्र डिजिटल माध्यमांकडे स्पर्धक म्हणून न पाहता प्रचाराचे साधन म्हणून पाहण्याची गरज आहे. नाटकाची पोस्टर्स, कलाकारांच्या मुलाखती, तालीमीची दृश्ये आणि प्रयोगांच्या चित्रफिती सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यास ग्रामीण रंगभूमी नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकते. मोबाईलवरील मनोरंजन कितीही वाढले तरी रंगमंचावर कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये निर्माण होणाऱ्या जिवंत संवादाची जागा कोणतेही माध्यम घेऊ शकणार नाही, असा त्यांचा विश्वास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT