न्यायालय  Pudhari File Photo
गोवा

Matthew Dcosta Bail Rejected | पाच जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Matthew Dcosta Bail Rejected | पोलीस उपनिरीक्षकाशी बाचाबाची अन् सरकारी कामात अडथळा; सांगे प्रकरणातील आरोपींवर अटकेची टांगती तलवार

पुढारी वृत्तसेवा

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा
सांगे येथील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बेकायदा प्रवेश करून सांगे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णदीप बोरकर यांच्याशी बाचाबाची केल्याचा आरोप असलेल्या गोवा फॉरवर्डच्या युवा आघाडीचे अध्यक्ष मॅथ्यू डिकॉस्टा यांच्यासह अन्य चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

डिकॉस्टा यांच्यासह दत्ताराम राऊत देसाई, विराज नागेकर, प्रितानंद कुर्डीकर आणि सूरज बाळळीकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सोमवारी या अर्जावर युक्तिवाद झाला. सरकारी वकील सॅनफोर्ड फर्नांडिस यांनी संशयितांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला.

या प्रकरणात सर्व संशयितांची सखोल चौकशी करणे आवश्यक असून, त्यासाठी पोलीस कोठडीची गरज असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. संशयितांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असून, त्यांना शोधण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले असता ते तिथे आढळून आले नसल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले.

उपनिरीक्षक कृष्णदीप बोरकर यांच्याशी झालेला वाद तसेच सांगे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बेकायदा प्रवेश करून सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी सांगे पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला होता.
सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्यासाठी दुखापत करणे, बेकायदा जमाव करणे, सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणे आणि धमकी देणे, या आरोपांखाली त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी संशयितांनी १४ ऑगस्ट रोजी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणातील पाचही संशयितांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी घेतली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पाच संशयितांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT