अंजली नाईक 
गोवा

अभिनयातील जादूगार : अंजली नाईक

अभिनयातील जादूगार : अंजली नाईक

पुढारी वृत्तसेवा

अभिनय ही अशी जादू आहे की, जी खोट्याला खरं करून दाखवते. रंगमंचावर एक माणूस रडला की, हजारो प्रेक्षकांचे डोळे पाणवतात, हा एक चमत्कार आहे. एकच कलाकार दोन तास हसवतो, रडवतो, चिडवतो, घाबरवती. प्रेक्षक त्या दोन तासांपुरते स्वतः वे जग विसरताच हीच अभिनयाची खरी मोहिनी आहे. ही मोहिनी घालण्याचे काम प्रत्येक नाट्य कलाकार करत असतो. नाटक संपते, पण अभिनय मनात घर करून राहतो. अशाच प्रकारची अभिनयातील जादू‌गार असलेली अभिनेत्री म्हणजे करी-फोंडा येथील अंजली नवनाथ नाईक होय.

अंजली ऊर्फ शेवंती नवनाथ नाईक हिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकण्याचे काम सुरूच ठेवले आहे. नाटकातील पात्रांच्या भावना, विचार आणि व्यवहारात स्वतःला एकरूप करून घेण्याची कला तिने अवगत केली आहे. बोलके डोळे, पात्रांप्रमाणे साजेसा आवाज आणि शरीराच्या हालचालीद्वारे भावना व्यक्त करून प्रेक्षकांची मने जिंकण्याचे काम अंजली करीत आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांचे अवलोकन करून आपल्या अभिनयात आवश्यक ते बदल करण्याची अंजलीची वृत्ती हेच तिचे बलस्थान आहे. आपल्या अभिनयाचा अभ्यास करणे आणि त्यात सुधारणा करण्यासाठी ती धडपडत असते.

अंजली नाईक हिचा जन्म २८ फेब्रुवारी २००१ रोजी फोंडा येथे झाला. 'फिर दिल है मर्द वाला' या नाटकाच्या अभिनयातून तिने रंगमंचावर पहिले टाकले. त्यापूर्वी तीने शालेय पातळीवर गॅदरिंगमध्येही अभिनय केला होता. तिची आत्या गीताली नाईक यांच्याकडून तिला अभिनयासाठी मार्गदर्शन मिळत गेले. साई किरण महिला नाट्य मंडळ, केरी या मंडळाने एकदा अंजली हिला फोन करून 'दारूवाला' भूमिका तुला करायची आहे, ती तू करणार का? असे बिचारले असता अंजलीने क्षणात त्याला होणार दिला.

प्रशांती शिरोडकर यांच्याकडून तिने भूमिका समजावून घेतली. नितेश नाईक यांचेही तिला मार्गदर्शन मिळाले, नाटघ क्षेत्रात प्रशांत सतरकर है तिचे गुरू आहेत. सुचिता नार्वेकर या त्याच्या आवडत्या अभिनेत्री आहेत. १३ लाख ६४ हजार, रूबी, ऑल द बेस्ट, हसत राह्या, कोणाचे खरे, देव बरे करू अशा नाटकामधून ३०० पेक्षा जास्त प्रयोग तिने सादर केलेले आहे. शिवाय वाडी कोकणी आणि दत्तक मराठी या दोन टेली फिल्ममध्ये तिने आपला अभिनय सादर केला आहे.

अंजली नाईक म्हणाली, नाटक हे लाईव्ह असते. त्यामुळे रिटेक संधी मिळत नाही. त्यामुळे नाटकात पात्र सादर करताना खूप काळजी घ्यावी लागते. लोकनृत्य कार्यक्रमातही तिने आपली कला सादर केली आहे. गौरीश नाईक हा तिचा आवडता अभिनेता आहे. नाटकात भूमिका करण्याबरोबरच नृत्यालाही न्याय देण्याचा प्रयत्न करते. अंजली म्हणाली, ऑल द बेस्ट या नाटकाचा रात्री १२ वाजता प्रयोग होता. नाटक होणार की नाही, याचा पत्ता नव्हता. आपल्याला बरे वाटत नव्हते. दवाखान्यात अॅडमिट करण्याची वेळ आली होती. तीन सलाईन लावावे लागले. डॉक्टराला विनंती करून आपण नाटकाला जाण्यास परवानगी घेतली. बारा वाजता ते नाटक दर्जेदार करून दाखवले. रंगदेवता आपल्या सोबत आहे, हा विश्वास आपल्याला आजही आहे. आपल्याला १३ लाख ६४ हजार नाटकाचे काहीच कळत नव्हते. परंतु या नाटकाने आपल्याला एबीसीडी शिकवण्याचे काम केल्याचे ती सांगते.

अंजली म्हणाली, श्री वेताळ देवाच्या गंध पूजेचा वर्धापन उत्सव म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. लहानपणापासून शाळेतून घरी जाताना देवळाजवळ भरलेली वेगवेगळे खाद्यपदार्थ खेळण्याची फेरी, विविध दुकाने नाटकांचे पोस्टर दिसायचे, बाबा आपल्याला रात्रीच्या वेळी नाटकाला घेऊन जायचे, त्याच वेळेपासून आपल्याला नाटकाची आवड लागली. नाटकाची गोडी दिवसेंदिवस वाढत गेली. आपण एक दिवस नाटक करणारच असे आपल्याला बाटत होते. आणि ती इच्छा २०२१ गावातील साई किरण महिला नाट्य मंडळ संस्थेच्या माध्यमातून संधी आपल्याला मिळाली. फिर भी दिल है मर्दवाला या नाटकात मला काम मिळाले. त्यातील भूमिकेसाठी कलाकार प्रशांती नाईक, नीतेश यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

गोव्यातील प्रसिद्ध कलाकार प्रशांत सतरकर यांनी दिग्दर्शित केलेले तेरा लाख ६४ हनार या नाटकांमध्ये मुख्य भूमिका मिळाली. सुरुवातीला आपल्याला त्या नाटकात भूमिका करताना भीती वाटत होती. परंतु पूर्ण कलाकारांनी मला धीर दिला. माझ्यातला आत्मविश्वास वाढवला आणि आम्ही हसत खेळत त्या नाटकाचे अनेक प्रयोग केले, भांगराळे गोय अस्मिता या नाट्य स्पर्धेमध्ये हे नाटक दूसरे आले होते. आपली भूमिका कॉमेडी होती आणि त्या भूमिकेला प्रथम आणि प्रकाश योजनेसाठी प्रथम बक्षीस मिळाला होते. त्यानंतर आपण मागे वळून पाहिले नाही. रुची, ऑल द बेस्ट नाटक या नाटकांनी मला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्या नाटकात मी माझे बालपण जगले. एक दिवस असा आला नाटकाच्या दिवशी सलाईन आणि चार इंजेक्शन घेऊन आपल्याला नाटक करावं लागलं हे आपण कधीही विसरत नाही.

हसत राहूया, कोणाचे खरे, देव बरी करू, या नाटकांचे ७५ पेक्षा जास्त प्रयोग करण्याची संधी आपल्याला मिळाली. नाटकाच्या पहिल्या प्रयोगावेळी आपण आजही सातेरी देवी आणि वेताळ देवाला पाया पडून सुरुवात करते. नाटक म्हटल की स्त्री कलाकारा बदल विचार वेगळच असतो. घरातली घर मंडळी उठण्यापूर्वी नाट्य कलाकारांना घरात यावे लागत होते.

नाटक करीत असताना आपल्याला लघुपटातही काम करण्याची संधी मिळाल्याचे अंजली सांगते. विठ्ठल शांतादुर्गा कला मंच यांनी वेगवेगळ्या प्रकारे मला आधार दिला. आवडता लेखक पुंडलिक नाईक, दिग्दर्शक सुशांत नाईक यांचा ती आवर्जुन उल्लेख करते. अंजली नाईक या नावामागे नाट्य कलाकार म्हणून आपली ओळख झाली. हीच आपली ओळख कायम राखण्यासाठी मिळालेल्या भूमिकेला न्याय देण्याचा आपण अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे ती आवर्जून सांगते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT