Goa Flower Farming 
गोवा

Goa Flower Farming | पतीच्या निधनानंतरही हार मानली नाही! पेणेच्या अनिशा सामंत यांनी प्रतिकूल परिस्थितीत फुलवली झेंडूची शेती

Goa Flower Farming | अनिषा सामंत यांचा प्रेरणादायी प्रवास; दुग्ध व्यवसायासाथी झेंडूच्या फुलशेतीचा प्रयोग

पुढारी वृत्तसेवा

कोरगाव : मकबूल माळगीमनी

पेणे तालुक्यातील तांबोशे येथील अनिशा सामंत यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दुग्ध व्यवसाय आणि शेतीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पतीच्या अकाली निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत त्यांनी शेती आणि दूध उत्पादनाचा व्यवसाय सुरू ठेवला. आता त्यांनी झेंडूच्या फुलशेतीचा प्रयोगही हाती घेतला असून, त्यांच्या जिद्दीची आणि मेहनतीची परिसरात प्रशंसा होत आहे.

पतीच्या निधनानंतर कुटुंबाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली. मात्र, परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी धैर्याने आव्हानांचा सामना केला. सातत्यपूर्ण मेहनत, जिद आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी प्रगतिशील शेतकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. मुलासह कुटुंबांच्या सहकार्याने त्या शेती आणि दुग्ध व्यवसायाची जबाबदारी सांभाळत आहेत.

या दोन्हीतून त्या आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहेत. दुग्ध व्यवसाय करतानाच आपण अजून काहीतरी केले पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात आला. त्यानंतर त्यांनी झेंडू फुलांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. अनिशा सामंत यांनी यंदा प्रथमच झेंडूच्या फुलांची लागवड केली आहे.

शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्पादनांच्या संधी वाढवण्याच्या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला. या प्रयोगाला यश मिळाल्यास पुढील वर्षी अधिक मोठ्या क्षेत्रात झेंडूची लागवड करण्याचा मानस त्यांनी केला आहे.
बाजारारातील फुलांवर अवलंबून राहण्याऐवजी प्रत्येकाच्या घरच्या किंवा शेताच्या परिसरात शक्य असेल तिथे झेंडू रोपे लावावीत. त्यामुळे सण-समारंभ आणि पूजेसाठी लागणारी फुले घरच्या परिसरातच उपलब्ध होऊ शकतात, असे अनिशा सामंत सांगतात. यंदाचा प्रयोग यशस्वी झाल्यास मुलगा आणि कुटुंबाच्या सहकार्याने पुढील वर्षी फुलशेतीचा विस्तार करण्याचा त्यांचा विचार आहे.

ग्रामीण भागातील महिलांनी परिस्थितीसमोर हार न मानता स्वतःच्या पायावर उभे राहून शेती व व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असा संदेश त्यांच्या माध्यमातून मिळतो. पारंपरिक शेतीसोबत फुलशेतीसारखे नवे प्रयोग करून उत्पादनाच्या संधी निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न इतर शेतकऱ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.

... तर कोणतीही गोष्ट होते साध्य:

युवा पिढीला आणि महिलांना संदेश देताना अनिशा सामंत म्हणतात, 'कष्ट करण्याची तयारी, जिद्द आणि चिकाटी असेल, तर जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करता येते.' त्यांच्या संघर्षतून आणि शेतीतील प्रयोगातून महिलांच्या आत्मनिर्मितेचे प्रेरणादायी उदाहरण समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT