पणजी : पुढारी वृत्तसेवा
कळंगुटचे काँग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडीस यांनी प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमित पाटकर यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्याला गोवा काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती, असा खुलासा केल्यामुळे व गोवा काँग्रेस पक्ष स्थापनामागे अमित पाटकर हेच आहेत, असा जो संशय निर्माण झाला होता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.
कुडचडेत शुक्रवारी गोवा राखून यात्रा पोहोचेल तेव्हाच कदाचित यावरील उत्तरे मिळू शकतील.
काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर नाराज पाटकर यांनीच गोवा काँग्रेस पक्ष नोंदणीसाठी पुढाकार घेतल्याचा आरोप झाले.
अमित पाटकर यांना गोवा काँग्रेस पक्ष स्थापना करण्यामागे नेमके कोण नेते आहेत, असे विचारले असता वेळ येताच ते स्पष्ट होईल, असे उत्तर त्यांनी दिले होते. मात्र आग्नेल फर्नांडीस यांनी अमित पाटकर यांनी गोवा काँग्रेसमध्ये आपणाला येण्याची विनंती केली होती, त्याचबरोबर अनेक काँग्रेस नेते गोवा काँग्रेसमध्ये येणार असल्याचे सांगितले होते, असा खुलासा केल्यामुळे पाटकर हेच गोवा काँग्रेसच्या स्थापनामागे आहेत हा अनेकांचा संशय बळकट झाल्याचे मानले जाते.
थवी येथील जिल्हा पंचायत सदस्य नीलेश कांबळी यांनाही पाटकर यांनी गोवा काँग्रेससाठी सदस्य द्या म्हणून सूचना केल्यानंतर त्यांनी पाच जणांची नावे त्यांना दिल्याचे उघड झाल्यामुळे काँग्रेसने कांबळी यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.
राखून यात्रेत सहभाग नाही
अमित पाटकर हे सध्या राज्यात सुरू असलेल्या गोवा राखून यात्रेत सहभागी झालेले नाहीत. गिरीश चोडणकर यांना पत्रकारांनी पाटकर हे राखून यात्रेत का सहभागी होत नाहीत, असे विचारले असता ज्याचा त्याचा प्रश्न असे चोडणकर म्हणाले. त्यामुळे पाटकर यांनी अद्याप काँग्रेस पक्ष सोडलेला नसला तरी काँग्रेस नेतृत्वाचा त्यांच्यावरील विश्वास उडालेला आहे. हे गिरीश चोडणकर यांच्या बोलण्यावरून दिसून येते.