Panjim Babush Monserrate 
गोवा

Panjim Babush Monserrate | रुग्णालयात जाऊन उमेदवाराच्या आईवर दबाव? पणजी निवडणुकीत मोन्सेरात यांच्यावर गंभीर आरोप

Panjim Babush Monserrate | 'आम्ही पणजीकर'चा आरोप; मंत्री पद काढून घेण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजीचे आमदार व महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आम्ही पणजीकर पॅनेलच्या उमेदवारांवर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणला. बुधवार रात्रीपासून त्यांनी प्रयत्न केले, आमच्या उमेदवारांना विविध आमिषे दाखवली. महापालिका निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मोन्सेरात यांचे मंत्रीपद काढून घ्यावे, अशी मागणी आम्ही पणजीकर पॅनेलतर्फे करण्यात आली आहे.

गुरुवारी उमेदवारी मागे घेण्याचा दिवस होता. उत्पल पर्रीकर, दत्तप्रसाद नाईक व सुरेंद्र फुर्तादो यांच्या नेतृत्वाखालील आम्ही पणजीकर या पॅनलच्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घ्यावेत, यासाठी मोन्सेरात व त्यांच्या सचिवांनी कालपासून दबावाचे राजकारण केले.

ते म्हणाले, एका इस्पितळात आम्ही पणजीकर पॅनेलमधील एका उमेदवाराची आई उपचार घेत होती तेथे बाबुश मोन्सेरात पोचले आणि तिच्यावर दबाव टाकून मुलाला उमेदवारी मागे घेण्यास सांग, असा तगादा लावला, असा आरोप नाईक यांनी यावेळी केला.

मोन्सेरात हे मंत्री असल्यामुळे ते सरकारी अधिकाराचा वापर करून महापालिका निवडणुकीमध्ये घोटाळा करू शकतात. मतदारावर व उमेदवारांच्या समर्थकांवर दबाव टाकू शकतात.

मतदारांना आमिषे दाखवून मते घेऊ शकतात. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद काढून घ्यावे अशी मागणी नाईक यांनी यावेळी केली. आम्ही पणजीकर पॅनेलचा एकूण बारा उमेदवारावर मोन्सेरात व त्यांच्या सचिवांनी दबाव टाकल्याचे सांगून बुधवारपासून दबावाचे राजकारण सुरू झाले. मात्र, पॅनेलमधील एकाही उमेदवाराने उमेदवारी मागे घेतली नाही असे नाईक यांनी सांगितले.

आत्मविश्वास डळमळला का..?

३० पैकी ३० उमेदवार निवडून आणणार, असा जाहीर दावा मंत्री मोन्सेरात यांनी केला होता. मात्र आता त्यांचा आत्मविश्वास डळमळला आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम्ही पणजीकर पॅनलकडून त्याच्या पॅनेलचा पराभव होणार हे मोन्सेरात यांनी आताच मान्य आहे.

त्यामुळेच त्यांनी आमच्या उमेदवारांवर दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचा आरोप नाईक यांनी केला. याप्रकरणी राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली जाणार असल्याचेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT