डिचोली : पुढारी वृत्तसेवा
नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सदैव सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. डिचोली बसस्थानकाची नागरिकांना आतुरता होती. हे बसस्थानक आंतरराज्य वाहतूक सेवा देणारे असून महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येणाऱ्या बसेस थेट येथे जोडल्या जातात.
भविष्यात राज्यातील सर्व बसस्थानके आंतरराज्य वाहतूक व्यवस्थेशी जोडण्याबरोबरच कुळे, पोळे, केरी यांसारख्या सीमाभागातील नाक्यांवरून ग्रामीण भागात बससेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
फित कापून, कोनशिलेचे अनावरण तसेच समई प्रज्वलित करून बसस्थानकाचे लोकार्पण करण्यात आले. स्वागत कदंब महामंडळाचे संचालक अरविंद खुटकर यांनी केले.
डिचोली बसस्थानकाचे काम लवकर पूर्ण होणे ही काळाची गरज होती. १० मार्च २०२२ रोजी आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम या बसस्थानकाच्या कामाचा पाठपुरावा करून ते सुरू केल्याचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष मायकल लोबो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, माजी सभापती राजेश पाटणेकर, गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहित कदम, कदंब महामंडळाचे संचालक अरविंद खुटकर, साधनसुविधा विकास महामंडळाचे संचालक दत्ताराम चिमुलकर, प्रितेश नाईक गावकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन समृद्धी गणपुले यांनी केले, तर आभार वाहतूक अधिकारी शिवानंद पेणेकर यांनी मानले.
'उज्ज्वला गोवा' योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार केला जात असल्याचा आरोप आमदार मायकल लोबो यांनी केला. या योजनेमुळे इतर योजनांचे पैसे बंद होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, 'उज्ज्वला गोवा' योजनेमुळे इतर कोणत्याही योजनांचा निधी बंद होणार नाही, याची शाश्वती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
त्यामुळे नागरिकांनी कोणतीही धास्ती बाळगू नये, असे लोबो यांनी सांगितले. गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाचा ताबा घेतल्यानंतर राज्यभर महामंडळामार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी डिचोली बसस्थानकाची पाहणी करून त्याचे काम लवकर पूर्ण करून लोकार्पण करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार बसस्थानकाचे लोकार्पण होत असल्याचा आनंद असल्याचेही लोबो यांनी सांगितले.