Pune Government Land Pudhari
गोवा

Land Sale Ban | अडवाई गावातील ग्रामस्थांचा ऐतिहासिक ठराव; बाहेरच्यांना 'नो एन्ट्री'

Land Sale Ban | गावाबाहेरील व्यक्तींना जमीन विक्रीला नकार

पुढारी वृत्तसेवा

वाळपई : पुढारी वृत्तसेवा

सत्तरी तालुक्यातील अडवाई गावाने गावाचे अस्तित्व, सांस्कृतिक वारसा, सामाजिक एकात्मता आणि नैसर्गिक पर्यावरण जपण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. रविवारी (दि. २ ऑगस्ट) श्री शांतादुर्गा देवस्थानच्या प्रांगणात झालेल्या विशेष ग्रामसभेत गावातील कोणतीही जमीन, घर, प्लॉट अथवा इतर मालमत्ता गावाबाहेरील व्यक्ती किंवा संस्थेला विक्री न करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

ग्रामस्थांच्या मते हा निर्णय केवळ जमीन विक्रीपुरता मर्यादित नसून गावाची अस्मिता, सांस्कृतिक ओळख, देवस्थान परंपरा, सामाजिक रचना आणि भावी पिढ्यांचे हक्क जपण्यासाठी घेण्यात आला आहे. सभेला देसाई, राणे, भटजी, गावकर, कुंभारगांवकर, परवार, परिट, नाईक, गावडे यांच्यासह विविध समाजांचे प्रतिनिधी, पाचही पिढ्यांचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेत ग्रामीण भागातील जमिनी मोठ्या प्रमाणावर बाहेरील व्यक्तींकडे गेल्यास गावाची मूळ ओळख, पारंपरिक शेती, सांस्कृतिक वारसा आणि देवस्थानांच्या परंपरांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. पूर्वजांनी जपलेल्या जमिनी या केवळ आर्थिक संपत्ती नसून गावाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग असल्याने त्या भावी पिढ्यांसाठी जतन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

ठरावानुसार, गावातील मालमत्ता कोणत्याही परिस्थितीत बाहेरील व्यक्ती अथवा संस्थेला विकली जाणार नाही. मात्र, गावातील कुटुंबीय, नातेवाईक किंवा बहिणीच्या अथवा भावाच्या मुलाला कौटुंबिक गरजेसाठी मालमत्ता देण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

ग्रामस्थांनी सांगितले की, ग्रामीण भागात वाढत असलेल्या जमीन खरेदी-विक्रीमुळे अनेक गावांची पारंपरिक ओळख बदलत आहे. स्थानिकांना भविष्यात घरबांधणीसाठी जमीन उपलब्ध राहावी, तसेच गावातील सामाजिक समतोल अबाधित राहावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. विकासाला विरोध नसला तरी तो स्थानिकांच्या हिताचा, पर्यावरणपूरक आणि गावाच्या परंपरा जपणारा असावा, अशी भूमिका ग्रामसभेत मांडण्यात आली.

पर्यावरण संवर्धनावर भर...

सभेत पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण, पारंपरिक जलस्रोत, शेती आणि वनसंपदा जपण्यावरही भर देण्यात आला. युवकांनीही या निर्णयाला उत्स्फूर्त पाठिंबा देत गावाचा वारसा, स्थानिक रोजगार आणि शाश्वत विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

सभेच्या शेवटी सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने ठराव मंजूर करून गावाची जमीन, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपण्यासाठी कायम एकत्र राहण्याची शपथ घेतली. ग्रामीण भागातील वाढत्या जमीन विक्रीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय इतर गावांसाठीही आदर्श ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT