पणजी : पुढारी वृत्तसेवा
सुमारे आठ वर्षे चाललेल्या खटल्यानंतर म्हापसा तालुक्यातील खोर्ली येथील ३२ वर्षीय आरोपीची बलात्काराच्या आरोपातून उत्तर गोवा विशेष पोक्सो न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. पुराव्यांमध्ये शंका असल्याने आरोपीला 'संशयाचा फायदा' देत न्यायालयाने हा निर्णय दिला.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा संदर्भ देत न्यायालयाने स्पष्ट केले की, दोन सज्ञान व्यक्तींमधील दीर्घकालीन परस्पर संमतीने असलेले प्रेमसंबंध नंतर मतभेद निर्माण झाल्यामुळे किंवा आंतरजातीय विवाहाला कुटुंबाचा विरोध झाल्यामुळे बलात्कार ठरत नाहीत.
म्हापसा पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, संशयित आणि तक्रारदार यांच्यात २०१३ पासून प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, तसेच सप्टेंबर २०१५ मध्ये ती गरोदर राहिल्यानंतर संशयिताने लग्नाचे आश्वासन पाळले नाही आणि तिच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होता.
खटल्यादरम्यान न्यायालयाने तक्रारदार, तिची बहीण, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांच्यासह १२ सरकारी साक्षीदारांची साक्ष नोंदवली. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, संबंधांच्या सुरुवातीपासूनच संशयिताचा लग्नाचा कोणताही फसवणुकीचा हेतू होता किंवा केवळ खोट्या आश्वासनाच्या आधारे तक्रारदारची संमती मिळवण्यात आली होती, असे सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा सरकारी पक्ष सादर करू शकला नाही.