Death Pudhari
गोवा

Accident Death | "सोनसोडो येथील अपघातात गंभीर जखमी झालेल्या रमेश माळीचा मृत्यू! उपचारात हलगर्जीपणाचा कुटुंबीयांचा आरोप"

Accident Death | उपचारात हलगर्जीपणा केल्याचा कुटुंबीयांचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

सोनसोडो येथे झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी होऊन ब्रेन डेड घोषित करण्यात आलेल्या २० वर्षीय रमेश माळी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे अपघातानंतरच्या आपत्कालीन प्रतिसादापासून रुग्णालयातील उपचार प्रक्रियेपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जखमीला वेळेत उपचार मिळाले नाहीत तसेच वैद्यकीय उपचारात कथित दिरंगाई झाली, असा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला असून, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मायणा येथील कारगिल रामनगरीचा रहिवासी रमेश माळी हा गुरुवारी दुपारी सोनसोडो परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका वॅगन-आर कारने ओव्हरटेक करताना त्याच्या दुचाकीला धडक दिल्याचा आरोप आहे.

अपघातानंतर रमेश गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडला होता. त्याला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली नसल्याने त्याची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. रमेशला प्रथम मडगाव येथील हॉस्पिसिओ रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील प्राथमिक उपचारांनंतर त्याला पुढील उपचारांसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), बांबोळी येथे हलविण्यात आले.

मात्र, जीएमसीमध्ये दाखल झाल्यानंतरही अनेक तास उपचार सुरू करण्यात विलंब झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. काही काळ तो स्ट्रेचरवरच पडून होता तसेच डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीबाबत परस्परविरोधी माहिती देण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला रमेशचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तो जिवंत असून ब्रेन डेड अवस्थेत असल्याचे सांगत त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या संपूर्ण प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कुडतरीचे आमदार राहुल शणभाग यांनी रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT