Casinos  
गोवा

Mandvi River Casino Protest | "कॅसिनोचे जहाज पाण्यात उतरून बंद पाडू"; नवीन कॅसिनो जहाजावरून गोव्यात राजकारण तापले

Mandvi River Casino Protest | वाल्मिकी नाईक : नव्या जहाजाला करणार प्रखर विरोध

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मांडवी नदीत येणाऱ्या नवीन कॅसिनो जहाजाला स्थानिक विरोध करत आहेत. मात्र; सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. पुढील दोन दिवसांत जहाज येण्याची शक्यता आहे. जहाजाला परवानगी दिल्यास प्रसंगी पाण्यात उतरून कॅसिनोचे जहाज बंद पाडू, असा इशारा आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी दिला.

बुधवारी स्थानिकांनी बंदर कप्तान खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन जहाजाला नदीत आणण्याची परवानगी न देण्याची मागणी केली. यावेळी सबिना मार्टिन, हरीश मडकईकर, जॅक सुखिया व अन्य उपस्थित होते.

नाईक म्हणाले की, सरकारने नव्या कॅसिनोला परवानगी देणार नसल्याचे म्हटले आहे. असे असले तरी जुन्या परवान्यावर नवे जहाज आणले जाणार आहे. जुने जहाज लहान होते. नवीन येणारे जहाज तुलनेने खूप अधिक मोठे आहे.

एका अर्थाने येथील एक लहान जहाज जाऊन त्याऐवजी सहा जहाजे येण्यासारखेच आहे. याआधी आम्ही पणजी महापालिकेला जहाजाला विरोध करण्याची विनंती केली आहे. आता आम्ही बंदर कप्तानांना भेटून हीच मागणी केली आहे.

स्थानिकांना गृहीत धरल्यास आम्हाला आंदोलन करावेच लागेल. हरीश मडकईकर म्हणाले की, रेईश मागूश पंचायतीने २८ जानेवारी रोजी बंदर कप्तान खात्याला मोठ्या जहाजाला परवानगी देऊ नये, असे पत्र लिहिले होते. खात्याने ९ फेब्रुवारी रोजी दिलेल्या उत्तरानुसार जहाजाला राज्य सरकारने परवानगी दिली असून हा विषय खात्याच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.

नव्या जहाजाबद्दल प्रत्येक जण हात वर करत आहेत. पणजीसह, रेईश मागूश, रायबंदर, चोडण येथील नागरिकांनी देखील या कॅसिनो जहाजाला विरोध करणे आवश्यक आहे.

कॅसिनोवर नजर ठेवणार

सबिना मार्टिन म्हणाल्या की, मोठ्या कॅसिनो जहाजामुळे पणजीतील समस्या वाढणार आहेत. येथील वाहतूक कोंडी, कचरा प्रश्न, गुन्हे वाढणार आहेत. यामुळे आम्ही याला विरोध करत आहोत. पुढील काही दिवसांत नदीत नवीन जहाज येण्याची शक्यता असून आम्ही त्यावर नजर ठेवणार आहोत. याप्रश्नी आमदार तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT