Eco Friendly Ganesh Utsav 
गोवा

Eco Friendly Ganesh Utsav | पार्से येथील 90 वर्षांची मूर्तिकलेची परंपरा! न्हायगीणकर कुटुंबाचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा ध्यास

Eco Friendly Ganesh Utsav | पारर्से येथील आप्पा न्हायगीणकर यांनी जपली पारंपारिक मूर्तिकलेची परंपरा; 90 वर्षांचा वारसा आजही जिवंत

पुढारी वृत्तसेवा

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
मातीला आकार देताना जो आनंद मिळतो, तो इतर कोणत्याही क्षेत्रात मिळू शकत नाही. पारंपरिक कला जपली तर तिचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज पोहोचतो आणि घरात कलात्मक वातावरण असेल तर ही परंपरा पिढ्यानपिढ्या अखंड सुरू राहते, असे मत पार्से येथील न्हायगीणवाड्यातील ज्येष्ठ मूर्तिकार लक्ष्मण उर्फ आप्पा भानुदास न्हायगीणकर यांनी व्यक्त केले.

न्हायीगीणकर कुटुंबाची सुमारे ९० वर्षांची पारंपरिक गणेशमूर्ती चित्रशाळा आजही सुरू असून संपूर्ण कुटुंब गणेशमूर्ती निर्मितीच्या कार्यात सहभागी असल्याचे प्रेरणादायी चित्र येथे पाहायला मिळते. पूर्वजांकडून मिळालेला हा वारसा जपत आजची पिढीही चिकणमातीच्या सुंदर आणि आकर्षक गणेशमूर्ती घडवत आहे.

आप्पा न्हायगीणकर यांच्या चित्रशाळेत गणेशमूर्ती हाताने घडवल्या जातात. मातीला योग्य आकार देऊन सुबक, देखण्या आणि पारंपरिक मूर्ती तयार करण्याचे काम आजही कौशल्याने केले जाते. आप्पा न्हायगीणकर सांगतात की, त्यांच्या वडिलांच्या काळात दरवर्षी ७० ते ८० गणेशमूर्ती तयार होत असत. मात्र, आज वाढत्या मागणीमुळे त्यांच्या चित्रशाळेत २०० हून अधिक चिकणमातीच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. गोव्याच्या विविध भागांतून या मूर्तींना मोठी मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, नवीन मूर्तिकार तयार झाले तर प्रत्येक घरापर्यंत पर्यावरणपूरक चिकणमातीच्या गणेशमूर्ती सहज पोहोचू शकतील. प्रत्येक गणेशभक्ताने जाणीवपूर्वक चिकणमातीच्या गणेशमूर्तीचीच प्रतिष्ठापना करण्याचा संकल्प केला, तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर आपोआप कमी होईल.

मोठ्या कुटुंबांमध्ये आजही मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करण्याची परंपरा कायम असल्याचे सांगताना आप्पा म्हणाले की, कुटुंबाच्या परंपरेनुसार विविध आकारांच्या मूर्ती तयार केल्या जातात. इको-फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्याबाबत त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. अशा मूर्ती हलक्या असतात; मात्र त्यासाठी नियोजन आवश्यक असते. जून महिन्यापासूनच निर्मिती सुरू केल्यास अधिक प्रमाणात हलक्या आणि पर्यावरणपूरक मूर्ती तयार करता येतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

निसर्ग संवर्धनात हातभार लागावा

मातीसह नैसर्गिक साहित्याचा वापर करून तयार झालेल्या गणेशमूर्तीचे पूजन केल्यास पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होईल. निसर्ग संवर्धनात आमचाही हातभार लागावा, हीच आमची इच्छा आहे, असे भावनिक आवाहन आप्पा न्हायगीणकर यांनी केले.

चिकणमातीच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत पार्से येथील न्हायगीणकर कुटुंब गेली नऊ दशके पारंपरिक मूर्तिकलेचा वारसा जपत असून, स्थानिक चिकणमातीच्या गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी गणेशभक्तांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT