गँगस्टर बिश्नोई टोळीतील 6 गुंडांना कळंगुटमध्ये अटक.  Pudhari File Photo
गोवा

गँगस्टर बिश्नोई टोळीतील 6 गुंडांना कळंगुटमध्ये अटक

पंजाबमध्ये खुनी हल्ला करून घेतलेला आसरा

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पंजाबमध्ये दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर खुनी हल्ला करून गोव्यात लपून बसलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीतील सहाजणांच्या मुसक्या आवळण्यात पंजाब पोलिसांना यश आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अवघ्या चार दिवसांत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. पंजाब पोलिस त्या सहाही जणांना घेऊन सोमवारी सकाळी गोव्यातून पंजाबला रवाना झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर रोजी पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील सिटी खरार पोलिस स्थानकाच्या हद्दीतील एका कॉलेजच्या आवारात हा खुनी हल्ल्याचा प्रकार घडला होता. फिर्यादी हरदीप मलिक व कुशल या दोघा विद्यार्थ्यांवर संशयित आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. दोघांवर सिटी खरार मधील इस्पितळात उपचार सुरू आहेत. हा हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी गोव्यात आले होते. रविवारी 15 रोजी सहाही संशयित आरोपी गोव्यात कळंगुट येथे वास्तव्यास असल्याची माहिती सिटी खरार पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर पंजाब पोलिसांनी कळंगुट पोलिसांशी संपर्क साधला.

संशयित आरोपी माड्डोवाडा कळंगुट येथील हॉटेल स्मॉल डॅडीमध्ये असल्याची खात्री कळंगुट पोलिसांना झाली. पोलिस निरीक्षक परेश नाईक व उपनिरीक्षक पराग पारेख यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने या हॉटेलवर छापा टाकत संशयितांना ताब्यात घेत संशयितांना पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सोमवारी सकाळी सिटी खरार पोलिस संशयितांना घेऊन पंजाबकडे रवाना झाले. अटक केलेले हे सहाही संशयित आरोपी भारतीय गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्या टोळीशी संलग्न असल्याचे पंजाब पोलिसांचा अंदाज आहे.

गँगस्टर बिश्नोई ‘तिहार’ मध्ये

गँगस्टर बिश्नोई हा सध्या तिहार कारागृहात बंदिस्त असून, त्याच्याविरुद्ध दोन डझनपेक्षा जास्त गुन्हे नोंद आहेत. वरील अटक केलेल्या संशयितांवर खुनी हल्ला, खंडणीसह एकूण 18 गुन्हे नोंद आहेत.

अटक करण्यात आलेले संशयित...

संशयित आरोपींवर पंजाबमध्ये एकूण 18 गंभीर गुन्हे नोंद आहेत. यश्विर जगदीश चौधरी (वय 21, रा. नोहका, राजस्थान), कपील सुरेंद्र खत्री (22, रा. मोहाली व मूळ हरियाणा), हर्ष राजकुमार तावर (19, रा. मोहाली व मूळ हरियाणा), सौरव सतीश कुमार बैन्नीवाल (19 रा. हरियाणा), अनुजकुमार जयपाल चौधरी (19, रा. मोहाली व मूळ हरियाणा) व राहुल हिमराज डगर (21, रा. फरिदाबाद, हरियाणा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT