Goa Police File Photo
गोवा

Goa Police | गोवा पोलीस दलात 58 उपअधीक्षक पदे रिक्त; कामाचा ताण वाढल्याने प्रशासन प्रभावित

Goa Police | अधीक्षकांकडे अतिरिक्त ताबा; पर्यवेक्षण यंत्रणेवर वाढला ताण

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा पोलिस दलातील उपअधीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांची मोठी कमतरता निर्माण झाली असून, मंजूर ७० पदांपैकी तब्बल ५८ पदे (८३ टक्के) रिक्त आहेत. पदोन्नती मिळालेल्या अधीक्षकांकडे उपअधीक्षकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. सध्या केवळ १२ उपअधीक्षक पदे भरलेली असल्याने पोलिसांच्या पर्यवेक्षकीय व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे.

काही उपअधीक्षकांकडे दोनपेक्षा अधिक अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
उपअधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाकडून होत आहे.

विशेषतः पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या पोलिस निरीक्षकांना नियमांनुसार वेळेत पदोन्नती देण्याची गरज पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी मुख्य सचिवांना पाठवलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.

उपअधीक्षक पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने अनेक ठिकाणी पोलिस अधीक्षकांवर उपअधीक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील कामाचा भार वाढला असून, दैनंदिन पोलिस प्रशासन, तपासावर देखरेख आणि कायदा-सुव्यवस्थेच्या व्यवस्थापनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

उपअधीक्षक पदावरील मनुष्यबळाची कमतरता दूर करा (चौकट)

पोलिस दलाची पर्यवेक्षकीय यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठी रिक्त पदे भरणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. पात्र आणि योग्य पोलिस निरीक्षकांना निष्पक्ष, पारदर्शक आणि नियमांनुसार वेळेत पदोन्नती देऊन उपअधीक्षक पदावरील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT