सप्टेंबर महिन्यात 195 रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. 
गोवा

गोवा : सप्टेंबरमध्ये रस्ते अपघातांत 18 जणांचा मृत्यू

राज्यात 195 रस्ते अपघात; 13 जणांना गंभीर, 13 जणांना किरकोळ दुखापत

पुढारी वृत्तसेवा

पणजी : राज्यात दरवर्षी सुमारे 5 हजार रस्ता अपघात होतात व त्यात सुमारे 300 व्यक्ती बळी पडतात. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात 195 रस्ते अपघात झाले आणि त्यात 18 जणांचा मृत्यू झाला, तर 13 जण गंभीर जखमी झाले आणि 34 जणांना किरकोळ दुखापत झाली. दरम्यान, वाहतूक खात्याने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

या आकडेवारीनुसार, सप्टेंबरच्या महिन्यात एकूण 12 हजार 392 वाहन चालकांना चलन जारी करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या 195 रस्ते अपघातांपैकी 15 अपघात हे अत्यंत भीषण स्वरूपाचे होते. यात उत्तर गोव्यातील 10, तर दक्षिण गोव्यातील 5 अपघातांचा समावेश आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 18 पैकी 10 जण दुचाकी चालक होते.

162 मद्यपी चालकांवर गुन्हा

पोलिसांनी राबवलेल्या तीन दिवसांच्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान दारू पिऊन वाहन चालवणार्‍या 162 चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दारूच्या नशेत सापडलेल्यांमध्ये दुचाकीस्वार, कारचे चालक तसेच अवजड वाहनचालक यांचा समावेश होता, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. अल्कोहोलच्या अमलाखाली सापडलेल्या चालकांवरील खटल्यांव्यतिरिक्त, वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम उल्लंघनात सापडलेल्या 938 वाहनधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्याचबरोबर 1,524 वाहनचालकांनी ट्राफिक सिग्नलचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.

जून 2023 पासून सव्वा लाख चालकांना चलन

एआय स्मार्ट सिग्नल यंत्रणा आणि सीसीटीव्ही कॅमेराद्वारे वाहतूक नियम भंग करणार्‍यां सव्वा लाख वाहन चालकाना आत्तापर्यत चलन देण्यात आले. 1 जून 2023 ते 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीत 1.25 लाखांहून अधिक चलन जारी करण्यात आले आहेत. याद्वारे 11.35 कोटी रुपयांचे चलन जारी करण्यात आले आहेत. राज्यात सध्या या यंत्रणा दहा ठिकाणी कार्यरत आहेत. यंत्रणेद्वारे सर्वाधिक 51 हजार 270 चलन ट्रॅफिक हे वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याबाबत देण्यात आले आहेत. विमा नसल्याबद्दल 8768, विना हेल्मेट दुचाकी 7901, वाहन कर न भरणे 6590 चलन देण्यात आले आहेत. राज्यात सुमारे 8 कोटी रुपये खर्च करून 10 ठिकाणी एआय आणि सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT