

गौतम बचुटे/केज
मद्यधुंद अवस्थेत ताब्यातील वाहन चालवून चेक पोस्ट वरील बॅरिकेट्सला धडक देवून कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करून पळून जाणाऱ्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल केला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. ६ नोव्हेंबर रोजी मद्यरात्री ११:०० वजण्याच्या सुमारास कासारी फाटा ता. केज येथील स्थिर निगराणी पथकतील कर्मचारी कमलाकर राऊत, जाधव, शेटे यांच्यासह पोलीस कर्मचारी सचिन अहंकारे, नन्नवरे आणि वाहतूक शाखेचे गोरख फड हे त्यांचे कर्तव्य बजावत होते. यावेळी मद्यधुंद अवस्थेतील स्कॉर्पिओ क्र. (एम एच-१६/ बी वाय-२४२५) चालक रमेश पांडुरंग मुंडे (रा. कोठरबन ता. वडवणी) याने त्याच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगात वेडी-वाकडी वळणे घेत चालवीत येत असताना दिसला. त्याला गणवेशातील कर्मचाऱ्यांनी इशारा करुन थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने नाकाबंदी कामी रस्त्यावर लावलेले सरकारी बॅरिकेड्सला जोराची धडक देवुन नुकसान केले.
पोलीसांनी त्याला ताब्यात घेवून त्याची विचारपूस केली असता, त्याच्या तोंडाचा उग्र वास येत असल्याने त्याची ब्रेथ ॲनालायझर उपकरणाने तपासणी केली. यावेळी ५५० एम जी/१०० मिली प्रमाण आढळून आले आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्या वरून पोलीस जमादार गोरख फड यांच्या तक्रारी वरून रमेश पांडुरंग मुंडे (रा. कोठरबन ता. वडवणी जि. बीड) याच्या विरुदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार चंद्रकांत काळकुटे हे तपास करीत आहेत.