Goa FDA Raid  file photo
गोवा

Goa FDA Raid | ताळगावात एफडीएची मोठी कारवाई! 120 किलो निकृष्ट दर्जाची मिठाई जप्त करून केली नष्ट

Goa FDA Raid | सणासुदीत भेसळयुक्त मिठाई विक्रीचा प्रयत्न उधळला; बेळगावच्या पुरवठादाराला ताळगावात पकडले

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
निकृष्ट दर्जाची मिठाई पुरवल्याप्रकरणी गोवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई करत बेळगाव येथील एका पुरवठादाराला ताळगाव येथे ताब्यात घेतले. खासगी वाहनातून मिठाईचा पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सुमारे १२० किलो मिठाई जप्त करून नष्ट करण्यात आली.

या कारवाईदरम्यान हस्तिमल गोहिलोट या पुरवठादाराकडून सुमारे १२० किलो मिठाई जप्त करण्यात आली. संबंधित मिठाई मानकांनुसार नसल्याचा आरोप असून, ती सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे तपासणीत आढळून आले.

तपासणीदरम्यान संबंधित पुरवठादाराकडे वैध एफएसएसएआय (FSSAI) परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे अन्नपदार्थांचा पुरवठा करताना आवश्यक परवाना आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन झाले नसल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले.

एफडीएने या कारवाईची माहिती बेळगाव एफडीए आणि प्रादेशिक वाहतूक कार्यालयाला (आरटीओ) दिली असून, संबंधित पुरवठादाराविरोधात पुढील आवश्यक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याने अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि वैध परवान्यांचे पालन याबाबत एफडीएकडून तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT