पणजी ; विठ्ठल गावडे-पारवाडकर : सत्ताकारणाच्या निवडणुकीत तर्काला फारसे स्थान असत नाही आणि गोव्यासारख्या छोट्याशा राज्यात, तर विचारायची सोयच नाही. गोव्याने राजकीय अवकाशात माकडांना लाजवणार्या कोलांटउड्या तीस वर्षांहून जास्त काळ अनुभवल्या आहेत. त्यामुळे आयाराम-गयाराम राजकीय संस्कृतीसाठी गोवा भलताच प्रसिद्ध आहे. 2017 च्या निवडणुकीनंतर निवडून आलेल्या 40 पैकी तब्बल 27 आमदारांनी पक्षांतर केले. (Goa Election)
ही आकडेवारी 13 जानेवारी 2022 पर्यंतची आहे. हा एक विक्रमच. त्यामध्ये आणखी भर पडेल, असेच राजकीय वारे सध्या वाहताहेत. निकालानंतरही उड्यांची गती वाढू शकते. छोटे राज्य हे एक पक्षांतराचे कारण अभ्यासक सांगतात ते अर्धसत्यच; 'अर्थ'पूर्ण सत्ता हाच मूळमंत्र. याला कोणताच पक्ष अपवाद नाही.
2017 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये एकाच वेळी घाऊकरीत्या 10 आमदारांनी रातोरात उड्या मारल्या. एका पक्षाच्या समर्थनार्थ जाहीर सभेत दणक्यात भाषण ठोकून झाले की, रातोरात किंवा दुसर्या दिवशी दुसर्याच पक्षात गाजावाजा करत, दमदार एन्ट्री मारत सरकार पाडण्याचा उद्योग गोव्यातील जनतेने अनुभवला आहे.
असा पराक्रम करणार्यांमध्ये विद्यमान आमदारांपैकी सध्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार चर्चिल आलेमाव व आमदार बाबूश मोन्सेरात यांचा नंबर जास्त वेळा लागतो. ही मंडळी कधीही, कोणत्याही पक्षाच्या लेबलखाली राजकीय नृत्य करू शकतात.
इतिहासात डोकावताना दिसते की, माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फे्रड डिसोझा यांनी, तर अनेक सरकारे घडवली आणि पाडलीही. त्यामुळे पक्षांतराची परंपरा गोव्यात विशेष आणि गतीने होणारी आहे.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 17, भाजपचे 13, मगोपचे 3, गोवा फॉरवर्डचे 3, अपक्ष 3 व राष्ट्रवादी काँग्रेस 1 असे आमदार निवडून आले. गोवा फॉरवर्ड व मगोपच्या पाठिंब्यावर भाजपचे सरकार घडले व मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाले. सुरुवातीला विश्वजित राणे, त्यानंतर दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर या तीन आमदारांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या उमेदवारीवर पोटनिवडणुका लढवून विजय मिळवला. त्यानंतर 10 आमदारांनी पक्षांतर केले.
भाजप सरकारला अडीच वर्षे झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे गंभीर आजाराने निधन झाले आणि डॉ. प्रमोद सावंत मुख्यमंत्री झाले. त्यानंतर मगोपच्या तीनपैकी बाबू आजगावकर व दीपक प्रभू पाऊसकर या दोन आमदारांनी नियमाचा आधार घेत भाजपात प्रवेश केला. लगेच काँग्रेसच्या उर्वरित 15 पैकी 10 आमदारांनी काँग्रेसमध्ये एक तृतियांश फूट पाडून भाजपात प्रवेश केला.
2017 मध्ये निवडून आलेल्या 40 पैकी 27 आमदारांनी पक्षांतर केले. निवडणूक काळात 11 आमदारांनी पक्षांतर केले. यात सर्वाधिक काँग्रेसच्या 15, मगोपच्या दोन आमदारांनी व राष्ट्रवादीच्या एक आमदाराने पूर्वी पक्षांतर केले. निवडणूक काळात भाजपच्या चार, काँग्रेसच्या तीन, गोवा फॉरवर्डच्या एक व तीन अपक्षांनी आमदारकी सोडून पक्षांतर केले आहे.
विश्वजित राणे यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर सहा तास होण्यापूर्वीच आमदारकी सोडली. एका हॉटेलमध्ये काँगे्रेसच्या नवीन आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ नेता निवड होण्यास उशीर होत असल्याचे पाहून त्यांनी भाजपशी संपर्क साधला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. निवडून आल्यानंतर त्यांनी सहा तासांत हा पराक्रम केला.