पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडने भारतीय संघाचा १० गडी राखून पराभव केला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स या जोडीने भारताच्या १६९ धावांच्या आव्हानाचा एकही विकेट न गमावता सहजरित्या पाठलाग केला. हेल्स आणि बटरलने पहिल्या विकेटसाठी १७० धावांची भागिदारी केली. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाचे चाहते निराश झाले आहेत. (Gavaskar On Indian Team)
चाहत्यांबरोबरच माजी क्रिकेटरही भारतीय संघाला प्रश्न विचारत आहेत. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही वर्कलोड मॅनेजमेंटवरून टीम इंडियाला सवाल केले आहेत. सुनील गावस्कर म्हणाले, भारतीय संघाने वर्कलोड मॅनेजमेंटच्या पुढे जाऊन विचार करायला हवा. जेव्हा तुम्ही विश्वचषकात विजय मिळवू शकत नाहीत, तेव्हा बदल होणारच. आपण पाहिले आहे की, न्यूझीलंड दौऱ्य़ासाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. (Gavaskar On Indian Team)
तुम्ही आयपीएलचा पूर्ण सीजन खेळता. त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यात तुम्ही प्रवासही करत असता. फक्त गेल्या वर्षीचे आयपीएल चार स्टेडियममध्ये खेळवण्यात आले होते. यापूर्वीचे सर्व आयपीएल वेगवेगळ्या स्टेडियमवर, वेगवेगळ्या राज्यात खेळवण्यात आले होते. तेव्हा तुम्हाला थकवा जाणवत नाही. तेव्हा तुम्हाला वर्कलोड नसतो? आयपीएलमध्ये वर्कलोड नसतो? फक्त भारतासाठी खेळताना वर्कलोड आठवतो, असे सुनील गावस्कर म्हणाले आहेत. (Gavaskar On Indian Team)