पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा
आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पिंपळगाव पोलिस ठाण्याकडून व्यापक सुरक्षा नियोजन केले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रेकॉर्डवरील १५ गुन्हेगारांना हद्दपार केले असून, ४६ व्यक्तींविरुद्ध विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पिंपळगाव पंचक्रोशीतील संवेदनशील ठिकाणी पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. बंदोबस्तासाठी ९ अधिकारी व १२० पोलिस अंमलदारांसह विशेष QRT पथक, होमगार्ड, पोलिस कर्मचारी व स्वयंसेवक तैनात राहणार आहेत.
गणेशोत्सव काळात कोणत्याही व्यक्तीच्या, समाजाच्या अथवा धर्माच्या भावना दुखावतील असे घोषणावाक्य, पोस्ट, स्टेटस, संदेश किंवा आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये. शांतताभंग करण्याचा किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई होईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
"गणपती बाप्पांचा उत्सव जल्लोषात साजरा करू या, मात्र कायद्याच्या चौकटीत आणि इतरांच्या आनंदाचा आदर राखून साजरा करू या."— गणेश गुरव, पोलिस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत
गणेश विसर्जनाच्या ठिकाणी संबंधित नगरपंचायत, महावितरण व इतर शासकीय यंत्रणांच्या समन्वयाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. विसर्जन घाटांवर बॅरिंकेडिंग, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा साधने, बोट, प्रशिक्षित पोहणारे, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच पोलिस बंदोबस्त ठेवणार आहे. नदी, तलाव वा जलाशयाच्या ठिकाणी नागरिकांनी धोकादायक पद्धतीने पाण्यात उतरू नये, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
गणेश मंडळांनी डीजे व ध्वनिप्रदूषणाबाबत प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांनी केले आहे. ध्वनिप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण तसेच इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दोन बॉक्सच्या मर्यादेपेक्षा अधिक डीजे साऊंड सिस्टीमचा वापर करू नये तसेच निर्धारित वेळेचे पालन करावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.