नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला हे तर लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासून या गणेशोत्सवाला सुरुवात झाली, लोक एकत्र येऊ लागले; मात्र लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वीच नंदुरबारमध्ये गणपतीची परंपरा सुरू झाली होती.
नंदुरबारमध्ये मानाचे दोन गणपती बसवण्याची परंपरा जवळपास १४४ वर्षे जुनी आहे. श्रीमंत दादा आणि श्रीमंत बाबा गणपती अशी या दोघांची नावे आहेत. एवढेच नव्हे तर या भागात मानाचे भाऊ, तात्या, काका, असेही गणपती बसवले जातात. विशेष म्हणजे दोन्ही गणपतीच्या मूर्ती काळ्या मातीपासून तयार केल्या जातात.
श्रीमंत दादा गणपतीची स्थापना १८८२ मध्ये करण्यात आली. त्यानंतर एका वर्षाने १८८३ मध्ये श्रीमंत बाबा गणपतीची स्थापना करण्यात आली. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव १८९३ मध्ये सुरू केला. त्यांच्या ११ वर्षे आधीच हे दोन गणपती नंदुरबारमध्ये स्थापन करण्यात आले होते. या दोन्ही गणपतींचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही गणपतींची मूर्ती रथावरच तयार केली जाते.
दोन्ही मूर्ती काळ्या मातीपासून तयार केल्या जातात. गणेशोत्सवाच्या आधी रथावर काळी माती टाकून मंडळाचे कार्यकर्ते कोणत्याही साच्याशिवाय या मातीला आकार देतात. दरवर्षी हा आकार सारखाच असतो, हे या गणपतींचे आणखी एक वैशिष्ट्य. गणपतीला आकार दिल्यानंतर या गणपतीला आकर्षक रंग दिले जातात. त्यानंतर त्यांच्यावर आभूषणे चढवली जातात.
नवसाला पावणारे अशी या दोन्ही गणपतींची ओळख आहे. त्यामुळे दरवर्षी श्रीमंत दादा आणि श्रीमंत बाबा गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. या गणपतींचे आणखी एक आकर्षण म्हणजे हरिहर भेट. ही परंपराही दोन्ही गणपतींच्या स्थापनेपासून कायम आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दोन्ही गणपतींची मिरवणूक निघते.
दोन्ही गणपतीच्या मिरवणुका जळका बाजार चौकामध्ये एकत्र येतात. रात्री ९ च्या सुमारास दोन्ही गणपती समोरासमोर येतात. त्यावेळी गुलाल उधळला जातो. मिरवणुकांमध्येही सर्वात पुढे दादा गणपती त्यानंतर बाबा गणपती आणि त्यानंतर इतर मानाचे गणपती असा क्रम असतो.
'दादा-बाबा' नावामागची परंपरा
नंदुरबारच्या गणेशोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गणपतींना कौटुंबिक नात्यांची नावे देण्याची परंपरा. दादा आणि बाबा यांच्याबरोबरच काका, मामा, भाऊ, तात्या अशा नावांचे मानाचे गणपती शहरात आहेत. त्यामुळे नंदुरबारचा गणेशोत्सव इतर शहरांपेक्षा वेगळा ठरतो. दादा आणि बाबा गणपतीच्या विसर्जनवेळी होणारी हरिहर भेट ही धार्मिक श्रद्धेबरोबरच नंदुरबारच्या सामाजिक-सांस्कृतिक एकोप्याचे प्रतीक बनली आहे.