Moti Dungri Ganesh File Photo
गणेशोत्सव

Jaipur Moti Dungri Temple: गणपतीला वाहतात मेहंदी अन् वर्षभरात जुळतो विवाह; भारतातील 'या' प्रसिद्ध मंदिराचा  अनोखा इतिहास

भारतात असं एक गणपतीचे मंदिर आहे, जिथे तरुण-तरुणींच्या विवाहात वारंवार अडथळे येत असतील, तर मंदिरात मेहंदी अर्पण करून ती स्वतःच्या हातावर लावल्यास वर्षभराच्या आत त्यांच्या विवाहाचा योग जुळून येतो.

पुढारी वृत्तसेवा

Moti Dungri Ganesh Temple

नवी दिल्ली: आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत, जिथे दर्शनासाठी भाविक दूरवरून येतात. या मंदिरांमध्ये भक्तांच्या नवसाला पावणारी अनेक जागृत देवस्थान आहेत. असेच एक खास स्थान म्हणजे जयपूरमधील ‘मोती डुंगरी गणेश मंदिर’. प्राचीन कथा आणि आधुनिक चमत्कार यांचा संगम असलेल्या जयपूर शहराच्या मध्यभागी हे मंदिर वसलेले आहे. हे पवित्र स्थान केवळ स्थानिक भक्तांनाच नव्हे, तर देशभरातील पर्यटकांनाही आकर्षित करते.

अशी श्रद्धा आहे की, येथे केलेली कोणतीही इच्छा लवकर पूर्ण होते. ज्या तरुण-तरुणींच्या विवाहात वारंवार अडथळे येत असतील, त्यांनी या मंदिरात मेहंदी अर्पण करून ती स्वतःच्या हातावर लावल्यास वर्षभराच्या आत त्यांच्या विवाहाचा योग जुळून येतो. त्यामुळेच, लग्नातील अडचणी दूर व्हाव्यात या इच्छेने अनेक अविवाहित तरुण-तरुणी येथे येऊन मेहंदी अर्पण करतात.

काय आहे मंदिराचा इतिहास?

मोती डुंगरी गणेश मंदिराची स्थापना १७६१ मध्ये सेठ जयराम पालीवाल यांनी केली होती. या मंदिराच्या निर्मितीमागे एक रंजक कथा आहे. मेवाडचे राजे एका लांबच्या प्रवासावरून परतत असताना त्यांच्यासोबत बैलगाडीत गणपतीची एक भव्य मूर्ती होती. बैलगाडी जिथे सर्वात आधी थांबेल, तिथेच या मूर्तीची स्थापना करायची, असा राजाचा संकल्प होता. बैलगाडी मोती डुंगरी टेकडीच्या पायथ्याशी येऊन थांबली आणि तिथेच मंदिराची स्थापना झाली. आजही हे मंदिर दैवी शक्तीसाठी प्रसिद्ध आहे आणि वर्षभर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. येथे दर बुधवारी जत्रा भरते.

शुभकार्याची पहिली पत्रिका गणपतीच्या चरणी

जयपूरच्या स्थानिक नागरिकांसाठी या मंदिराचे अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील कोणत्याही शुभकार्याची पहिली निमंत्रण पत्रिका याच मंदिरातील गणपतीच्या चरणी अर्पण करण्याची परंपरा आहे. नवविवाहित जोडपे देखील लग्नानंतरच्या पहिल्या दिवशी मंदिरात जाऊन गणपतीचे आशीर्वाद घेतात.

मेहंदी आणि ‘सिंजारा’ उत्सवाची परंपरा

मोती डुंगरी मंदिरात दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी ‘सिंजारा उत्सव’ अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बाप्पाला कित्येक क्विंटल मेहंदी अर्पण केली जाते. अशीही धारणा आहे की ही मेहंदी हातावर लावल्याने लवकर विवाह होण्याचा मार्ग मोकळा होतो. अविवाहित व्यक्ती या आशेने मंदिरात मेहंदी अर्पण करतात की, त्यांच्या विवाहातील अडथळे लवकरच दूर होतील. या मंदिरात पाळल्या जाणाऱ्या अनेक परंपरांचे भाविकांसाठी विशेष महत्त्व आहे आणि हे स्थळ एक अद्वितीय आध्यात्मिक ठिकाण म्हणून पूजनीय मानले जाते, जिथे इच्छा पूर्ण होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT