Konkan Ganeshotsav : कोकणच्या महाउत्सवास आजपासून प्रारंभ!

अवघा जिल्हा भक्तिमय; लाखो चाकरमान्यांचे आगमन, घरेदारे रोषणाईने उजळली
Konkan Ganeshotsav
Konkan Ganeshotsav
Published on
Updated on

रत्नागिरी : ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया...’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत लाडक्या गणरायाच्या आगमनाची लगबग रविवारी सायंकाळपासूनच सुरू झाली. भाद्रपद शुक्ल चतुर्थीनिमित्त सोमवारी (दि. १४) रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची विधिवत प्रतिष्ठापना होणार असून, गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

यंदा जिल्ह्यात तब्बल १ लाख ६९ हजार ६६४ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये १ लाख ६९ हजार ५३८ घरगुती, तर १२६ सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तयारीला आता अंतिम स्वरूप आले आहे. घरांची साफसफाई, सजावट, आरास, पूजेचे साहित्य तसेच गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी सायंकाळपासूनच मूर्तीशाळांमध्ये बाप्पाला घरी नेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाला घरी नेण्यात येत होते. अनेक ठिकाणी मिरवणुकीत गुलालाची उधळण करत बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

राजापूर, लांजा, चिपळूणमध्ये मोठी संख्या

जिल्ह्यातील पोलिस ठाणेनिहाय आकडेवारीनुसार, राजापूरमध्ये २० हजार घरगुती व ७ सार्वजनिक, लांजा येथे १६ हजार १४५ घरगुती व ६ सार्वजनिक, चिपळूणमध्ये १६ हजार ७२५ घरगुती व १६ सार्वजनिक, रत्नागिरी ग्रामीणमध्ये १४ हजार ७७३ घरगुती व १ सार्वजनिक, गुहागरमध्ये १४ हजार ४६० घरगुती व २ सार्वजनिक, संगमेश्वरमध्ये १३ हजार ५४४ घरगुती व २ सार्वजनिक, देवरूखमध्ये १२ हजार ४९३ घरगुती व ७ सार्वजनिक, तर खेडमध्ये १२ हजार ७०० घरगुती व २१ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.

रत्नागिरी शहरात ७ हजार ९०६ घरगुती व २६ सार्वजनिक, नाटे येथे ७ हजार २७९ घरगुती व ३ सार्वजनिक, दापोलीत ६ हजार ४७६ घरगुती व ९ सार्वजनिक, सावर्डे येथे १२ हजार ७५ घरगुती व १ सार्वजनिक, अलोरे-शिरगावमध्ये ४ हजार ५७० घरगुती व ४ सार्वजनिक, पूर्णगड येथे ३ हजार ७६८ घरगुती व १ सार्वजनिक, मंडणगडमध्ये २ हजार ९४५ घरगुती व ११ सार्वजनिक, दाभोळ येथे १ हजार ४९९ घरगुती व १ सार्वजनिक, तर बाणकोट येथे ७६० घरगुती व २ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.

चाकरमान्यांच्या आगमनाने कोकण फुल्‍ल

गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल झाले आहेत. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त बसफेऱ्या तसेच कोकण रेल्वेच्या विशेष गाड्यांमुळे गणेशभक्तांना गावी पोहोचणे सुकर झाले आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरात चाकरमान्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांवरही उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात पुढील दिवसांत गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news