Jalna Ganeshotsav 2026 pudhari photo
गणेशोत्सव

Jalna Ganeshotsav 2026 : ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण; बाप्पांचे थाटात आगमन!

जालना : गणेश भक्तांचा उत्साह, मिरवणुकीने वेधले शहरवासीयांचे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

जालना :'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत मंगळवार, दि.१४ रोजी जालना शहर व परिसरात विघ्नहर्त्याचे अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आले. यंदा शहरातील १ हजार ५२४ ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पांची भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यामुळे संपूर्ण उद्योग नगरी गणेशमय झाली आहे.

जालना शहरासह परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून बाप्पाच्या स्वागतासाठी गणेश मंडळांनी जय्यत तयारी केली आहे. यंदा मध्य प्रदेश, गुजरात व मुंबईतून अत्यंत आकर्षक गणेशमूर्ती शहरात दाखल झाल्या आहेत. मनमोहक मंडप, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आज श्रींची प्रतिष्ठापना झाली.

शहरातील तब्बल १,५२४ ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जात असून, ६५९ मंडळांनी प्रशासनाची रीतसर परवानगी घेतली आहे. याशिवाय, शहरातील सुमारे ८ हजार घरांमध्ये शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणपतींची स्थापना केली जाणार आहे.

ठाण्यांच्या हद्दीचा विचार करता सर्वाधिक १५२ मंडळांमध्ये गणेशमूर्तींची स्थापना बदनापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत होत आहे. बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण शहर गणेशमय झाले आहे. शहरातील गोवत्स के गणराज गणेश मंडळ, बडी सड़क, जालना यांच्या वतीने गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणरायाच्या आगमनाची पारंपरिक मिरवणूक उत्साहात काढण्यात आली.

यावेळी सजवलेल्या बैलगाडीत श्री गणपती बाप्पा विराजमान होऊन मंडळाच्या स्थळी दाखल झाले. कोणत्याही प्रकारची फॅन्सी व अनावश्यक बदल न करता प्राचीन व पारंपरिक स्वरूपातील साधी, सात्त्विक आणि प्रसन्न मूर्ती मंडळात विराजमान करण्यात आली आहे.

जालना शहरातील वेगवेगळ्या गणेश मंडळांनी पारंपारिक पध्दतीने मिरवणूक काढण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासोबतच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकांसोबतच गांधी चमन, शनिमंदिर, मोती बाग, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि बडी सडक या मुख्य ठिकाणी विशेष पोलिस ताफा तैनात करण्यात आला आहे.

उद्योगनगरी गणेशभक्तिमय

जालना शहरातील मुख्य चौकात गणेशाचे आगमन थाटात झाले. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात जालना शहरातील मुख्य रस्ते दणाणले. यामुळे उद्योग नगरी गणेशमय झाली. शहरात चैतन्याने वातावरण पाहायला मिळाले. तर जालना जिल्ह्यातील २३४ गावांमध्ये 'एक गाव एक गणपती' उपक्रमांतर्गत बाप्पाची स्थापना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT