चंद्रपूर :आगामी गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुका शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवत पार पडाव्यात, यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम राबविली आहे. या मोहिमेत ६१५ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई, ३९ जणांना तडीपार, तर १,७६१ संशयितांवर मिनी तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. तसेच दोन कुख्यात गुन्हेगारांवर MPDA कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाण्यांच्या ठाणेदारांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
६१५ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई
शांतता भंग करण्याची शक्यता असलेल्या ६१५ सराईत गुन्हेगारांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ व १२९ अंतर्गत चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेण्याची प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
३९ जण जिल्ह्यातून तडीपार
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या ३९ सराईत गुन्हेगारांना कायदेशीर प्रक्रियेनंतर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. गणेशोत्सवादरम्यान या व्यक्तींकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे.
१,७६१ संशयितांवर ‘मिनी तडीपार’
उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता असलेल्या १,७६१ संशयितांविरुद्ध BNSS कलम १६३ (२) अंतर्गत प्रतिबंधात्मक ‘मिनी तडीपार’ची कारवाई करण्यात आली आहे.
दोन कुख्यात गुन्हेगारांवर MPDA
वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्या दोन कुख्यात गुन्हेगारांवर MPDA कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून, त्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
AI CCTV व्हॅनमधून तडीपार गुन्हेगारांवर नजर
तडीपार केलेल्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलीस दलाच्या अत्याधुनिक AI सर्व्हेलन्स CCTV कॅमेरा व्हॅनचा वापर केला जाणार आहे. या प्रणालीमध्ये तडीपार गुन्हेगारांचे फोटो, चेहऱ्याची माहिती आणि इतर आवश्यक तपशील नोंदविण्यात आले आहेत.
तडीपारीचा कालावधी सुरू असताना संबंधित व्यक्तीने विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश केल्यास AI आधारित फेस रिकग्निशन प्रणालीद्वारे त्याची ओळख पटवून अलर्ट मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.