

नागपूर : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथित ‘दिव्य दरबारा’तील ‘पुत्रयोगा’च्या दाव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथील राजेंद्र कुमार हे पत्नीसमवेत बागेश्वर धाम येथे गेले होते. त्यावेळी पत्नीला पुत्रप्राप्ती होण्याचा दावा करण्यात आल्याचे राजेंद्र कुमार यांनी म्हटले आहे. मात्र, त्यानंतर त्यांच्या चौथ्या अपत्याच्या रूपाने मुलाऐवजी मुलीचा जन्म झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राजेंद्र कुमार यांच्या म्हणण्यानुसार, बागेश्वर धाम येथील दरबारात त्यांना पुत्रप्राप्ती होण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे कुटुंबात मुलगा होण्याची अपेक्षा निर्माण झाली होती. यापूर्वी त्यांना तीन मुली असून, चौथ्या अपत्याच्या वेळी मुलगा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, चौथ्यांदाही मुलीचा जन्म झाल्यानंतर त्यांनी या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले.
राजेंद्र कुमार यांनी या प्रकरणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधून तक्रार केली आहे. समितीचे राष्ट्रीय महासचिव हरीश देशमुख यांनी राजेंद्र कुमार यांच्याशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती घेतल्याचे सांगितले.
‘प्रेतबाधा’ आणि ‘पुत्रयोगा’चा दावा
राजेंद्र कुमार यांच्या कथनानुसार, बागेश्वर धाम येथे त्यांच्या पत्नीला कथितपणे ‘प्रेतबाधा’ असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर देण्यात आलेल्या एका पर्चीत ‘पुत्रयोग’ असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, प्रत्यक्षात मुलीचा जन्म झाल्यानंतर या दाव्याची वैज्ञानिक पद्धतीने पडताळणी करण्याची गरज असल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे.
पोलिसांत तक्रार दाखल करणार
या प्रकरणी राजेंद्र कुमार हे झाशी येथे पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित दावे, त्यामागील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांची कायदेशीर पद्धतीने कशी पडताळणी होते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, चौथ्या अपत्याच्या रूपाने मुलगी झाल्यानंतर राजेंद्र कुमार यांनी आपली भूमिका बदलली असून, ‘मुलीला शिकवून मोठी अधिकारी बनवणार’, असा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.