पुढारी, गडचिरोली वृत्तसेवा : शेतातील बांधावर गवत कापत असताना वाघीणीच्या हल्ल्यात एक महिला ठार झाली. ही घटना आज (दि.११) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यातील फरी (झरी) गावानजीक घडली. महानंदा दिनेश मोहुर्ले (वय.५३) रा.फरी असे मृत महिलेचे नाव आहे.
माहितीनुसार, महानंदा मोहुर्ले या आज (दि.११) सकाळी आपल्या शेतावर गेल्या होत्या. बांधावरचे गवत कापत असताना अचानक वाघीणीने तिच्यावर हल्ला करीत शेजारच्या जंगलात ओढत नेले. तिच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूच्या शेतांमध्ये काम करणारे काही शेतकरी तिच्या दिशेने धावत गेले. मात्र, तोपर्यंत वाघाने तिला फरफटत नेऊन ठार केले होते. माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत महिलेच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. घटनास्थळ परिसरात टी-१४ वाघीणीचा वावर असून, वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये ती आढळून आली आहे. आजचा हल्ला याच वाघीणीने केला असून, तिला पकडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती देसाईगंज वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी दिली.
हेही वाचा