नाशिक : श्रीफळ वाढवून गाळ काढण्याच्या अभियानाला प्रारंभ करताना जिल्हाधिकारी जलज शर्मा. समवेत विविध संस्था, संघटना, असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी तसेच ग्रामस्थ. दुसऱ्या छायाचित्रात ११ लाखांंचा निधी देणारे पीयूष सोमानी यांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी जलज शर्मा. 
Latest

‘जलसमृद्ध नाशिक’साठी १० मिनिटांत ४२ लाख ३३ हजारांचा निधी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेेवा
'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' योजने अंतर्गत जलसमृद्ध नाशिक फाउंडेशनतर्फे या अभियानाचा प्रारंभ मंगळवारी (दि. १६) गंगापूर धरण येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी या अभियानासाठी आर्थिक मदत म्हणून अवघ्या १० मिनिटांत ४२ लाख ३३ हजारांचा निधी उभा केला, तर काही मान्यवरांनी भरघोस निधी देणार असल्याचा शब्द दिला. पहिल्याच दिवशी सहा पोकलेन मशीन आणि २५ ट्रॅक्टर, टिप्परच्या साहाय्याने गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली.

गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरला गंगावऱ्हे गाव परिसरातून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जतिन रहमान, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र आमले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, संबंधित विभागाचे अधिकारी व सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक, बांधकाम संघटनांचे प्रतिनिधी, गंगावऱ्हे, सावरगाव व बेळगाव ढगा या गावांतील ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित देणगीदारांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत देणग्यांची रक्कम जाहीर केली. काहींनी रक्कम जाहीर न करता, भरघोस निधी देणार असल्याचा शब्द दिला. या देणगीदारांना आयकर ८० जी कलमानुसार किंवा काॅर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वानुसार प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जलसमृद्ध नाशिक अभियानातून धरणातील गाळ उचलण्यासाठी लागणारा खर्च फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाणार असून, शेतकऱ्यांना विनामूल्य गाळ उपलब्ध करून दिला जाणार असून, शेतकऱ्यांनी स्वखर्चाने गाळ वाहून न्यावा असे आवाहन करण्यात आलेे. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विजय हाके, राजा जॉली, पीयूष सोमानी, मकरंद सावरकर, शिंदे, लक्ष्मण बेंडकुळे यांनी मनोगत व्यक्त केले. नंदकुमार साखला, संजय सोनवणे यांनी स्वागत, सूत्रसंचालन केले, तर रमेश वैश्य यांनी आभार मानले. कार्यक्रमास सुनील गावडे, गोपाल अटल, कृणाल पाटील, जयेश ठक्कर, मनोज साठे, दत्तू ढगे, धनंजय बेळे, डॉ. सुधीर संकलेचा, डॉ खैरनार आदी उपस्थित होते.

यांनी दिला निधी
पीयूष सोमानी (ईएसटीएस) – ११ लाख
ताराचंद गुप्ता फाउंडेशन, श्री मंगल ग्रुप – पाच लाख
भाविक जयेश ठक्कर – पाच लाख
नाशिक मानव सेवा फाउंडेशन – पाच लाख
एबीएच डेव्हलपर्स – पाच लाख
सुरेश पाटील, श्रद्धा लॅण्ड डेव्हलपर्स – पाच लाख
सागर बाेंडे बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स – दोन लाख
सुमेरकुमार काले, अध्यक्ष मांगीतुंगी ट्रस्ट – एक लाख ११ हजार
पर्वतराज गुरड्डी सोमेश फोर्ज – एक लाख
पॅटको इंडस्ट्रीज रवींद्र पाटील – एक लाख
डॉ. उमेश मराठे – एक लाख
गंगावऱ्हे, सावरगाव ग्रामस्थ – ११ हजार
डॉ. प्रतिभा बोरसे – ११ हजार

जलसमृद्ध अभियानातून हरित नाशिक व पाण्याने समृद्ध असलेला जिल्हा साकारायचा आहे. दि. १६ एप्रिल ते १५ जून २०२४ पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. गंगापूर धरणाबरोबरच जिल्ह्यातील इतर धरणे व जलाशयांतून गाळ काढण्याचे काम करण्यात येणार आहे. भविष्यात दरवर्षी हे अभियान राबविण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील. तसेच धरणालगतच्या शेतजमिनींचे सीमांकन निश्चित करण्यासंदर्भात तलाठी यांना सूचित करून त्यानुसार गाळ काढण्याचे काम केले जाईल. – जलज शर्मा, जिल्हाधिकारी.

गेल्या पाच वर्षांपासून शासनामार्फत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. गाळ काढल्यामुळे या जलाशयाची पाणीधारण क्षमता निश्चितच वाढणार आहे. गंगापूर धरणाबरोबरच दारणा धरणही महत्त्वाचे असून, या धरणांमधून इतर शहरांनाही पाणी पुरवले जाते. या धरणांतील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतल्यास धरणालगत शहरीकरण नसल्याने काढलेला गाळ वाहून नेण्यास अडचण निर्माण होणार नाही. तसेच यासाठी लागणाऱ्या परवानग्या व इतर सहकार्यासाठी जलसंपदा विभाग तत्पर असेल.
प्रकाश मिसाळ, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

या संघटनांची मदत
जलसमृद्ध नाशिक अभियानासाठी शहरातील प्रमुख संस्थांबरोबरच भारतीय जैन संघटना, नाशिक मानव सेवा फाउंडेशन व आर्ट ऑफ लिव्हिंग यांचे विशेष पाठबळ लाभत आहे. इतर संस्थांंनीही पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले आहेे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT