पुणे : अपघात कमी करण्यासाठी आणि वाहनांची तपासणी अचूकपणे होण्यासाठी अवजड वाहनांची फिटनेस तपासणी (योग्यता प्रमाणपत्र) आता लवकरच 'स्वयंचलित मशिन'च्या माध्यमातून केली जाणार आहे. त्याकरिता संपूर्ण देशभरात परिवहन विभागांतर्गत 'अॅटोमॅटिक टेस्टिंग सेंटर'ची उभारणी केली जाणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने नुकतेच यासंदर्भातील आदेश काढले आहेत. त्यानुसार अवजड मालवाहतूक वाहने, मोठी आणि मध्यम प्रवासी वाहनांची फिटनेस तपासणी 'स्वयंचलित मशिन'वर येत्या 1 ऑक्टोबर 2024 पासून करणे शासनाने बंधनकारक केले आहे.
संबंधित बातम्या :
त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील आरटीओ कार्यालयांमध्ये ही अत्याधुनिक प्रणाली असलेली यंत्रणा उभारण्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे. पुण्यातील दिवे घाट आरटीओ कार्यालयातसुध्दा ही यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यामुळे अवजड वाहनांची फिटनेस तपासणी अचूकपणे होणार असून, रस्त्यावरील अवजड वाहनांचे अपघात कमी होणार आहेत.
नियम काय सांगतो?
परिवहन संवर्गातील वाहनांची पहिली आठ वर्षे फिटनेस तपासणी प्रत्येकी दोन वर्षांनी करण्यात यावी आणि आठ वर्षांनंतर वाहनाची फिटनेस तपासणी दरवर्षी करण्यात यावी. त्यानंतरच वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी योग्य असलेले फिटनेस सर्टिफिकेट म्हणजेच योग्यता प्रमाणपत्र दिले
जाते.
आरटीओ अधिकार्यांचा भार होणार कमी
सध्या आरटीओ अधिकारी (मोटार वाहन निरीक्षक) ट्रॅकवर स्वत: वाहन चालवून ते फिट आहे की नाही, याची तपासणी करतात. यात वाहनाची ब—ेक टेस्ट, इंडीकेटर, हेडलाईट, वायपर, कागदपत्रे यांसह अनेक गोष्टींची तपासणी केली जाते. ही सर्व यंत्रणा सुस्थितीमध्ये असेल, तरच वाहनाला फिटनेस सर्टिफिकेट म्हणजेच योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. परंतु, आता वाहनाची सर्व चाचणी यंत्राच्या माध्यमातून होणार असल्याने आरटीओ अधिकार्यांचा काहीसा भार कमी होणार आहे.
दिवे आरटीओतील फिटनेस तपासणीची स्थिती
– दिवसाला सुमारे 300 गाड्यांची फिटनेस
– महिन्याला सुमारे 6 ते 7 हजार गाड्यांची तपासणी
– 9 मोटार वाहन निरीक्षक आणि 9 सहायक मोटार वाहन निरीक्षक
– दिवे कार्यालयात 18 आरटीओ अधिकारी
– पुण्यात दिवे, आळंदी रोड, पिंपरीमध्ये मोशी येथील कार्यालयांत चालते कामकाज
या यंत्रणेचे आम्ही स्वागत करतो. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नाही. देशात सर्वप्रथम याची नाशिकमध्ये प्रायोगिक तत्त्वावर चाचणी सुरू आहे. पुण्यातही अशीच चाचणी व्हावी, त्यानंतरच यंत्रणा कार्यान्वित करावी. कोणतीही टेक्निकल एरर असू नये.
– बाबा शिंदे, अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य मालवाहतूक संघटना