Latest

बेळगाव : आधी सचिन, आता आशिष नेहराने दिला खानापूरकरांना सुखद धक्का, घेतला चहा, नाश्त्याचा स्वाद

मोहन कारंडे

खानापूर (बेळगाव); पुढारी वृत्तसेवा : भारताचा माजी कसोटीवीर आणि वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांनी आज (दि.२४) खानापूर शहरातील जांबोटी क्रॉस वरील एका हॉटेलमध्ये चहा आणि नाश्त्याचा स्वाद घेतला. गोव्याहून बेळगावला जात असताना सकाळी साडेआठच्या सुमारास बीएमडब्ल्यू आणि इनोव्हा कारमधून नेहरा आणि त्यांचे सहकारी खानापुरात दाखल झाले होते. अत्यंत साध्या पेहरावात असणाऱ्या नेहरा यांच्यासोबत अनेक तरुणांनी सेल्फी घेतली.

काही दिवसांपूर्वी वैजू निट्टुरकर या नागुर्डा (ता. खानापूर) येथील युवकाच्या मच्छे येथील चहाच्या दुकानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी चहाचा स्वाद घेतला होता. शिवाय हा प्रसंग त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आज आणखी एका स्टार क्रिकेट खेळाडुने खानापूरला भेट दिली. दोन महिन्यांत दोन दिग्गज खेळाडुंना पाहण्याची, भेटण्याची संधी तरुणांनी अनुभवली. यावेळी मलप्रभा क्रीडांगणावर नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळून चहासाठी आलेल्या खेळाडूंनी आशिष नेहरा यांना पाहताच त्यांना गराडा घातला. यावेळी "मित्रांनो नाश्ता करू द्या सगळ्यांशी बोलतो आणि सेल्फीही देतो," असे म्हणत उपस्थित खेळाडूंना त्यांनी निराश केले नाही.

दरम्यान, नेहरा यांनी खानापुरला भेट दिल्याने परिसरात हा कौतुकाचा विषय ठरला आहे. हॉटेलचे मालक महंमद नंदगडी हे स्वतः क्रिकेटचे मोठे चाहते असल्याने त्यांनी आजचा दिवस संस्मरणीय असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT