Latest

FIFA World Cup 2022 : ब्राझील शूटआऊटनंतर नेमार भावूक, अश्रू रोखू शकला नाही! (Video)

दीपक दि. भांदिगरे

दोहा : पुढारी ऑनलाईन; फिफा वर्ल्डकप (FIFA World Cup 2022) विजेतेपदाचा प्रबळ दावेदार समजल्या जाणार्‍या ब्राझीलचे वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले. गत उपविजेत्या क्रोएशियाने आधी त्यांना बरोबरीत रोखले आणि नंतर पेनल्टी शूटआऊटवर बाहेरचा रस्ता दाखवला. क्रोएशियाने जपानविरुद्धच्या सामन्याप्रमाणे ब्राझीलचा सामनादेखील पेनल्टी शूटआऊटमध्ये (penalty shootout) नेला. हा पेनल्टी शूटआऊटमधील सामना क्रोएशियाने ४-२ असा जिंकत फिफा रँकिंगमधील अव्वल स्थानावर असलेल्या ब्राझीलचे पॅक अप केले. ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमारने (Brazil superstar Neymar) एक्स्ट्रा टाईमच्या पहिल्या हाफमधील स्टॉपेज टाईममध्ये गोल करत आघाडी घेतली होती. मात्र क्रोएशियाच्या ब्रुनो पेटकोव्हिकने ११६ व्या मिनिटाला गोल करत बरोबरी साधली, पण पेनल्टी शूटआऊटवर ब्राझील स्पर्धेतून आऊट झाला.

या पराभवानंतर ब्राझीलचा स्टार स्ट्रायकर नेमार खूप भावूक झाला. त्याला अश्रू रोखता आले नाहीत. त्यानंतर सहकारी खेळाडूंनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. नेमार त्याच्या करियरमध्ये तिसऱ्यांदा फुटबॉल वर्ल्डकप खेळला. नेमार हा पेले आणि रोनाल्डो यांच्या व्यतिरिक्त ब्राझीलसाठी तिसरा विश्वचषक खेळणारा एकमेव ब्राझीलचा खेळाडू आहे.

नेमारची पेले यांच्या विक्रमाची बरोबरी

नेमारचा ब्राझील संघ जरी सेमीफायनलमध्ये पोहोचू शकला नसला तरी ब्राझीलच्या या दिग्गज खेळाडूने एक अनोखा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. नेमारने ब्राझीलसाठी ७७ गोल केले आहेत. यामुळे त्याने पेले यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. पेले यांनीही ब्राझीलकडून खेळताना त्यांच्या कारकिर्दीत एकूण ७७ गोल केले होते.

ब्राझीलला गोलपोस्ट भेदण्याची संधी दिली नाही

फिफा वर्ल्डकपमधील पहिला क्वार्टर फायनल सामना गतवेळचे उपविजेते क्रोएशिया आणि फिफा रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या ब्राझील यांच्यात झाला. ब्राझीलने संपूर्ण सामन्यात बॉलवर नियंत्रण ठेवत उत्कृष्ट पासिंगच्या जोरावर क्रोएशियाच्या गोलपोस्टवर दबाव वाढवला. मात्र क्रोएशियाची भिंत लिव्हाकोव्हिकने ब्राझीलच्या आक्रमणाला गोलपोस्ट भेदण्याची संधी दिली नाही. ब्राझीलने ९० मिनिटांत क्रोएशियावर तब्बल १८ वेळा चढाई केली. त्यातील ८ शॉटस् गोलपोस्टचा अचूक वेध घेणारे होते. मात्र बॉल आणि गोलपोस्टच्या मध्ये लिव्हाकोव्हिक उभा होता.

एक्स्ट्रा टाईममध्येदेखील ब्राझीलने दमदार सुरुवात करत क्रोएशियाच्या बचाव फळीला आणि गोलकिपरला चांगलेच कामाला लावले. मात्र, जसजसा सामना पुढे सरकत गेला तसे क्रोएशियाने आक्रमक चढाया करत ब्राझीलला टेन्शन देण्यास सुरुवात केली होती. मात्र, नेमारने एक्स्ट्रा टाईमचा पहिला हाफ संपायला काही मिनिटे शिल्लक असताना क्रोएशियाची गोलपोस्ट भेदली. त्याने लिव्हाकोव्हिकला चकवा देत ब्राझीलचा पहिला गोल डागला. यानंतर ब्राझीलला सेमीफायनल गाठण्यासाठी फक्त पुढची १५ मिनिटे क्रोएशियाचे आक्रमण रोखून धरायचे होते. मात्र, क्रोएशियाच्या ब्रुनो पेटकोव्हिकने ११७ व्या मिनिटाला ब्राझीलवर गोल करत सामना बरोबरीत आणत पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT