why is scorpion venom so expensive how much is 1 litre venom worth tedu
पुढारी ऑनलाईन : Scorpion Venom: तुम्हाला माहिती आहे का, 'या' जीवाचे विष सापाच्या विषापेक्षाही महाग असते आणि औषधे तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो?
साप आणि त्याच्या विषाबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल. पण सापाच्या विषापेक्षाही महाग दुसऱ्या एका जीवाचे विष असते, हे तुम्हाला माहीत आहे का? विशेष म्हणजे हा काही दुर्मिळ जीव नाही. तो तुम्हाला आजूबाजूला कुठे ना कुठे दिसू शकतो. अनेकदा तर तो घरातही आढळतो. या विषाची किंमत इतकी जास्त आहे की, एखाद्याकडे त्याचे जास्त विष असेल तर त्याला त्याबदल्यात कोट्यवधी रुपयांहून अधिक रक्कम मिळू शकते. चला तर जाणून घेऊया हा जीव कोणता आहे आणि त्याचे विष इतके महाग का आहे...
कोणत्या जीवाबद्दल बोलले जात आहे?
ज्या विषाबद्दल चर्चा होत आहे, ते म्हणजे विंचवाचे विष. विंचवाचे विष अत्यंत महागड्या दराने विकले जाते. बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, विंचवांच्या विविध प्रजातींपैकी डेथस्टॉकर (Deathstalker) प्रजातीचा विंचू सर्वात धोकादायक मानला जातो.
अहवालानुसार, या विंचवाच्या सुमारे एक गॅलन म्हणजेच 3.8 लिटर विषाची किंमत तब्बल 39 दशलक्ष डॉलर, म्हणजेच जवळपास 320 कोटी रुपये आहे. यानुसार एका लिटर विषाची किंमत जवळपास 100 कोटी रुपये होते.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इच्छा असूनही एक गॅलन विष खरेदी करता येत नाही. बाजारात हे विष अत्यंत कमी प्रमाणात विकले जाते. सुमारे 130 डॉलर (जवळपास 10 हजार रुपये) देऊन त्याचा फक्त एक थेंब मिळतो. हा थेंब साखरेच्या दाण्यापेक्षाही लहान असतो.
एवढे महाग का?
आता प्रश्न असा आहे की विंचवाचे विष इतके महाग का असते? यामागील प्रमुख कारण म्हणजे त्याची दुर्मिळता आणि ते मिळवण्याची अवघड प्रक्रिया.
विंचवांकडून हाताने एकेक करून विष काढले जाते. एक विंचू एका वेळी जास्तीत जास्त केवळ 2 मिलीग्रॅम विष देतो. म्हणजेच जर तुम्हाला एक गॅलन विष हवे असेल, तर एकाच विंचवाकडून तब्बल 26 लाख 40 हजार वेळा विष काढावे लागेल.
या विषाच्या प्रचंड किमतीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचा वैद्यकीय क्षेत्रातील वापर. विंचवाच्या विषामध्ये क्लोरोटॉक्सिन (Chlorotoxin) नावाचा घटक आढळतो. हा घटक मेंदू आणि स्पायनल कॅन्सरच्या पेशींशी जोडण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे कॅन्सरवरील संशोधन आणि निदानाच्या क्षेत्रात त्याचा वापर वाढत आहे.
विंचू हाताळणेही धोकादायक
या विंचूंना हाताळणेही सोपे नाही. अहवालानुसार, Venomtech कंपनीचे संस्थापक स्टीव्ह ट्रिम यांच्या मते, या विंचवाचा डंख मधमाशीच्या डंखापेक्षा सुमारे 100 पट अधिक वेदनादायक असू शकतो.
मात्र, वेदनेची तीव्रता मोजणे कठीण असल्याचेही ते मान्य करतात, कारण प्रत्येक व्यक्तीला वेदनेचा अनुभव वेगवेगळा असू शकतो.